
दिलीप कुमार यांना पाहण्यासाठी सायकलवरून गेलो होतो, शरद पवारांनी जागवल्या ट्रॅजेडी किंगच्या आठवणी!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा खासदार शरदचंद्रजी पवार यांचे राजकारणाच्या पलीकडे सर्वच क्षेत्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यांनी राजकारणा बरोबर मैत्री जपण्याला तितकेच प्राधान्य दिले आहे. शरद पवार आणि अभिनेते दिलीप कुमार यांची मैत्री चांगलीच प्रसिद्ध होती. दिलीप कुमार यांची प्राणज्योत मावळल्या नंतर शरद पवार यांनी दिलीप कुमार यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
शरद पवार यांनी तरुण असतानाचा किस्सा सांगितला आहे. ते म्हणाले ‘दिलीप कुमार यांना पहिल्यांदा जेजुरी मध्ये पाहिले’. ते म्हणाले की देशाने एक महानायक गमावला आहे. त्यांच्या अनेक आठवणी माझ्याकडे आहेत. जेजुरीत शुटिंग सुरू होतं. त्यावेळी आम्ही तरुण होतो. दिलीप कुमार यांची क्रेझ होती. शुटिंगची आम्हाला कुणकुण लागल्यावर आम्ही थेट सायकलवरून जेजुरी गाठली. तेव्हा पहिल्यांदा दिलीप कुमार यांना लांबून पाहिलं. नंतरच्या काळात विधिमंडळात राज्य सरकारमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर दिलीप कुमार आणि माझी मैत्री झाली. आमचं वेगळं नातं निर्माण झालं. माझ्या प्रत्येक निवडणुकीत ते माझा प्रचार करण्यासाठी एखाद दुसरी सभा घ्यायचे, इतकं सलोख्याचे संबंध असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे बोलत असताना शरद पवार म्हणाले “परदेशातही दिलीप कुमार लोकप्रिय होते. त्याची प्रचिती आम्हाला आली. आम्ही साऊथ ईस्ट देशात गेलो होतो. दिलीप कुमारही सोबत होते. इजिप्तमध्ये आम्ही उतरलो होतो. एका कार्यक्रमानंतर आम्ही बाहेर पडलो. तेव्हा दिलीप कुमार यांना पाहण्यासाठी इजिप्तमधील लोकांनी गर्दी केली होती. इतके ते लोकप्रिय होते. त्यांची लोकप्रियता भारतापुरतीच नव्हती, तर भारताबाहेरही ते लोकप्रिय होते”. असे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी दिलीप कुमार यांची भेट घेतली तसेच त्यांच्या प्रकृती बद्दल विचारपूस केली होती.