मलाही कळतंय की सहनशीलता संपत आलीये, पण आत्ताच तर एकमेकांची गरज आहे- अजित पवार

0

पुणे : गेल्या दोन दिवसांत राज्यात करोना प्रतीबधांत्मक लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होऊन, राज्यभरात अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ आली. त्यामुळे करोना प्रतिबंधात्मक लसींच्या पुरवठ्यावरुन सध्या राज्यात राजकारण प्रचंड तापलेलं आहे.

राज्य सरकार आणि केंद्रामध्ये या गोष्टीवरून वादंग सुरु असून, केंद्रातल्या आणि राज्यातल्या मंत्र्यांनी एकमेकांवर दोषारोप करणे सुरूच ठेवले आहे. एकीकडे केंद्र सरकारवर आघाडी सरकारमधल्या अनेक मंत्र्यांनी टीका केली आहे, तर दुसरीकडे केंद्राकडून देखील राज्य सरकारवर, या आरोपांची गंभीर दखल घेत ताशेरे ओढण्यात आले आहेत.

दरम्यान, पुण्यात देखील करोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून, परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका, व्हेंनटीलेटर्स अशा आरोग्य सुविधांची वानवा जाणवत असल्यामुळे, आरोग्य यंत्रणांची पाचावर धारण बसली आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात कोरोना आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला पुण्याचे पालकमंत्री, अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ हे देखील उपस्थित होते.

यावेळी अजित पवारांनी जिल्ह्याच्या करोना परिस्थितीचा आढावा घेतला तसेच, त्यावरच्या उपाययोजनांची केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा देखील केली. तसेच केंद्राकडून पुण्याला लसींचा पुरवठा जलद गतीने होईल व सर्वतोपरी सहाय्य मिळेल, या गोष्टीची हमी त्यांनी प्रकाश जावडेकरांकडून घेतली.

त्यांनी यावेळेस, मलाही कळतंय की सहनशीलता संपत आलीये, पण सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य करावे. तरच ही साखळी तोडता येईल. त्यामुळे एकमेकांवर सातत्याने टीका व राजकारण न करता, प्रत्येकाने आपापली जबाबदरी ओळखून काम करावे. “केंद्राने हे केलं नाही असं आम्ही म्हणायचं आणि त्यांनी म्हणायचं की आम्ही हे देतो,” अशा बाता न करता या लढाईत एकत्र काम करणं गरजेचं आहे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

उद्या पुण्यातल्या विभागीय आयुक्त, पोलीस आणि महापालिका आयुक्त यांच्यासोबत पवार व्यापाऱ्यांचीही बैठक घेणार असून, त्यानंतर दुकानांबाबतची भूमिका घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.