क्षमतांवर शंका घेतलेल्यांची तोंडं, “या” तरुणाने राज्याचा गृहमंत्री बनून केली गप्प

0

सांगलीच्या दुष्काळग्रस्त पट्ट्यातला तालुका, अशी ज्याची ओळख, तो सांगली जिल्ह्यतील तासगाव तालुका. या तालुक्यापासून २० कि.मी. अंतरावर असलेल्या एका खेडेगावातील एक तरुण, संघर्षाच्या पायऱ्या चढत चढत एक दिवस राज्याच्या राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतो. एक सामान्य माणसापासून थेट उपमुख्यमंत्री बनतो. ही त्या माणसाच्या संघर्षाची कहाणी. ही आहे आर. आर. आबांची कहाणी.

अंजनी या तासगावातल्या छोट्याशा गावात आबांचा क्जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव, रामराव पाटील. प्रतिष्ठित कुटुंब. शेतात कामाला ३-४ गडी. चांगली बागायती शेती. मोठं किराणा दुकान. रामराव पाटील गावचे सरपंच होते. १६ ऑगस्ट १९५७ रोजी रामरावांना मुलगा झाला. त्याचं बारसं करून नाव “रावसाहेब” ठेवण्यात आलं.

रावसाहेब सातवी मध्ये जाईपर्यंत सर्व काही व्यवस्थित होतं. पण घराचे वासे फिरले आणि रामरावांचं मोठं कुटुंब विभक्त झालं. वाटण्या झाल्या, दावे प्रतिदावे सुरु झाले. वाद अगदी कोर्टापर्यंत पोहचला. घराची रया गेली, कुटुंबाची प्रतिष्ठा गेली. गरीबी सोबत अनेक संकटं घेऊन आली.

रावसाहेबांचे वडील व्यसनाच्या अधीन गेले. घरात आई आणि पाच भावंडात थोरले रावसाहेब होते. आणि इथूनच त्यांच्या संघर्ष कहाणीची सुरुवात झाली. दरम्यान, अशा परिस्थितीत त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. अचानक खांद्यांवरती जबाबदाऱ्यांचं ओझं आलं.

मात्र अशिक्षित आईच्या आग्रहाखातर एकीकडे रावसाहेबांनी कॉलेजात बी.ए.च्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला होता, दुसरीकडे वडिलांची तब्येत अधिक बिघडली. आणि परीक्षा तोंडावर असताना रावसाहेबांच्या कानावर वडिलांच्या निधनाची बातमी पडली. रावसाहेबांना परगावाहून गावी येईपर्यंत वडिलांचे अंत्यसंस्कार पार पडले होते. वडिलांच्या निधनानंतर ते आईच्या कुशीत डोकं ठेऊन खूप रडले. त्याच मनःस्थितीत त्यांनी परीक्षा दिली आणि ते सांगली शहरात पहिले आले.

दरम्यान, त्यांनी परिस्थितीला हातभार लावण्यासाठी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न चालू केला. नोकरीच्या शोधात सांगलीच्या कारखान्यात वॉचमन आणि क्लार्कची जागा असल्याचे कळले. दोन्ही पदासाठी अर्ज केला. एमडीने सांगितलं क्लार्कच्या जागा नाहीत. रावसाहेब म्हणाले वॉचमन पण चालेल.

एमडीने रावसाहेबांवारून नजर फिरवली. आणि म्हणाला तुम्ही अन वॉचमन. त्यामुळे त्यांना वॉचमनची नोकरी देखील नाकारली गेली. हळू हळू कॉलेजमधेच त्यांचा राजकारणाकडे कल वाढला. गरिब शेतकरी कुटुंबातल्या या होतकरु तरुणाचे नेतृत्वगुण सुरवातीला वसंतदादा पाटलांनी हेरले. आणि पहिल्यांदा १९७९ साली सावळज मधून ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले.

त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पहिले नाही. १९९० साली पहिल्यांदा विधान सभेवर निवडून आले. १९९० ते २०१४ या काळात ते सतत विधानसभेवर निवडून आले. जिल्हा परिषद सदस्य पदापासून सुरु झालेला प्रवास सहा वेळा आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री पदापर्यंत येऊन पोहचला. एकेकाळी वॉचमनची नोकरी नाकारलेला रावसाहेब पाटील राज्याच्या राजकारणात आबा बनला. सामान्य जनता त्यांना प्रेमाने आबा म्हणून हाक मारू लागली आणि हा हा रावसाहेब शेवटपर्यंत आर आर आबाच राहिला.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.