
वेशांतरासह पालकमंत्री बच्चू कडू यांच्या कडून यंत्रणेची झाडा झडती!
अकोला जिल्हय़ाचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी वेषांतर करून महापालिकेच्या कारभाराची चौकशी केली. त्यांच्या या वेशांतराला बहुतांश अधिकाऱ्यांनी ओळखले नाही, ज्यांनी ओळखले किंवा ज्यांना या गोष्टीची कुणकुण लागली त्यांनी मात्र सावध भूमिका घेतली. हे वेषांतर सरकारी यंत्रणा कशी काम करते या हेतूने केले असल्याची माहिती मिळाली आहे. जिल्हय़ात गुटख्याची सर्रास विक्री होत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. या आढाव्यात चांगले व वाईट अनुभव आल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.
पालकमंत्री बच्चू कडू यांनी मुस्लीम व्यक्तीचे वेशांतर करून मुखपट्टी लावली होती. घरकुलाच्या मुद्यावर प्रहारच्यावतीने महापालिकेत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बच्चू कडू स्वत: सहभागी झाले. यावेळी त्यांनी आयुक्तांना भेटण्यासाठी त्यांच्या स्वीय सहायकाकडे विनंती केली होती मात्र त्यांना सांगण्यात आले की आयुक्त दुपारी ४ ते ५ दरम्यान भेटतील, असे उत्तर मिळाले.
पातूर शहरामध्ये जाऊन पातूर येथील पान केंद्रावर त्यांनी गुटखा मागितला. त्या ठिकाणी त्यांना गुटखा देण्याची तयारी दाखविण्यात आली. यावरूनच प्रशासनाचे दुर्लक्ष हे गुटखा विक्री कडे होत असल्याचे दिसून येत आहे. या बाबतीत पालकमंत्री बच्चू कडू यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. अशाप्रकारे अवैधपणे गुटखा विक्री होत असेल, तर बंदीला अर्थ काय असेही ते म्हणाले.