
कोल्हापूर-सांगलीला मोठा दिलासा ; अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला!
महाराष्ट्र मध्ये या वर्षी चांगल्याप्रकारे पाऊस झाल्यामुळे लवकरच धरणे भरली आहेत. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, राज्य सरकारने तात्काळ नदीकिनारी असणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. कोल्हापूर मधील महत्वाची समजली जाणारी पंचगंगा नदी ची पातळी ३६ फुटांवर पोहचली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ७७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत यामुळेच कोल्हापूरला महापुराचा धोका निर्माण झाला आहे. आपात्कालीन परिस्थितीत मदतीसाठी NDRF च्या दोन तुकड्या पुण्याहून कोल्हापूरला रवाना झाल्या आहेत.
राज्यातील सरकारने मागील चुकीची पुनरावृत्ती न होऊ देता यावेळी तात्काळ अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणातून ९७ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे.त्यामुळे कोल्हापूर – सांगलीला दिलासा मिळाला आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला चार दिवसाचा रेड अलर्ट प्रशासनाकडून देण्यात आला आहे.