आनंदाची बातमी! मान्सून १ जुनला केरळमध्ये धडकणार

0

आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. यंदा मान्सून १ जूनला केरळमध्ये धडकणार असल्याची माहिती केंद्रीय हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व शेतीच्या कामांना वेग येणार आहे. मान्सून १० जूनपर्यंत तळकोकणात दाखल होईल. तर १५ ते २० जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सून केरळनंतर सामान्यत: पाच-सहा दिवसांमध्ये महाराष्ट्रात दाखल होतो, त्या-त्या वेळच्या स्थितीनुसार तो लवकर किंवा विलंबाने पोहोचतो. त्यामुळे त्याचे महाराष्ट्रातील आगमन कधी होणार याबाबत उत्सुकता आहे.

यंदा सरासरीच्या ९८ टक्के अर्थात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यासंदर्भातलं परिपत्रक हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलं असून त्यामध्ये याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पॅसिफिक महासागर आणि हिंद महासागर यामध्ये होणाऱ्या अनुकूल बदलांमुळे भारतात मान्सून समाधानकारक राहणार असल्याचा हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे.

देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मान्सूनचा प्रवेश होतो. केरळमध्ये सर्वप्रथम मान्सूनचं आगमन होतं. केरळमध्ये दरवर्षी १२० दिवसांच्या पावसाळ्यामध्ये सरासरी २०४.९ सेंटिमीटर मान्सूनची नोंद व्हायची. पण गेल्या वर्षी केरळमध्ये सरासरीच्या तब्बल ९ सेंटिमीटर अधिक म्हणजेच २२२.७९ सेंटिमीटर इतका पाऊस पडला.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.