
साहेबांनी लावली पहिली नोकरी आता डायरेक्ट गृहमंत्री पद
शरद पवार म्हणजे राजकारणाचं चालतं-बोलतं विद्यापीठ. या विद्यापीठातून अनेक विद्यार्थ्यांनी राजकारणाचं बाळकडू घेतलं आणि मोठे झाले. पवारांच्या नावाभोवती महाराष्ट्राचं राजकारण गेली ५० वर्षे फिरत राहिले आहे आणि आजही फिरते आहे. देशाच्या राजकारणातील सर्वात अनुभवी नेते अशी आज शरद पवार यांची ओळख आहे.
अशा शरद पवारांकडे, एकदा काळजीत असलेले, शिरूर आंबेगावचे माजी आमदार दत्तात्रय वळसे पाटील आले. सोबत त्यांचा मुलगा दिलीपही होता. पवारांनी दोघांची विचारपूस केली, तेव्हा दत्तात्रयराव वळसे पाटील म्हणाले, “पोरगा बी.ए. झालाय. त्याची कुठे तरी नोकरीची व्यवस्था करा.”
पवारांनी दिलीपकडे पाहिलं. पवारांच्या चाणाक्ष नजरेने लगेच हेरलं की, मुलगा हुशार आहे, चुणचुणीत आहे. त्यांनी एक फोन फिरवला, पलीकडच्या व्यक्तीशी काहीतरी बोलणं झालं. त्याकाळात शिफाराशीद्वारे ओळखीच्या व्यक्तींना सहकारी संस्थांवर चिकटवणे, ही सोपी बाब होती. त्यामुळे अखेर पवारांच्या शिफारसीमुळे दिलीप पाटलांना राज्य सहकारी बँकेत नोकरी मिळाली.
खरं तर दिलीप वळसे पाटील यांनी बी.ए. नंतर कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं होत. मुंबईत त्यांना मास्टर्स पूर्ण करायचं होतं. पण वडिलांचा आदेश असल्यामुळे काही बोलता येत नव्हतं. या प्रसंगाला काहीच दिवस झाले असतील, कामासाठी सहज म्हणून एकदा पवारांची, राज्य सहकारी बँकेच्या नानासाहेब सपकाळ यांच्याशी भेट झाली. तेव्हा ओघाने पवारांनी त्यांच्याकडे, वळसे पाटलांच्या मुलाची चौकशी केली.
तेव्हा सपकाळ म्हणाले, “तुम्ही मुलगा पाठवला होता; पण त्याने मला नंतर येऊन सांगितलं की, त्याला नोकरी करायची नाही.” पवारांना या गोष्टीचं आश्चर्य वाटलं. नंतर अशीच काही वर्षे गेली. पवारांनी काँग्रेस सोडून, पुलोदची स्थापना केली. राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. पण राजकारणाचे फासे फिरले आणि केंद्रात इंदिरा गांधींची सत्ता आली आणि त्यांनी हे सरकार रद्द केलं.
शरद पवार राज्याचे विरोधी पक्ष नेते बनले. या काळात त्यांना विश्वासू स्वीय सहाय्यकाची आवश्यकता होती. यावेळी मात्र दिलीपराव वळसे पाटील या नोकरी साठी पुढे आले. ते शरद पवारांना भेटले आणि मला या नोकरीवर घ्या, अशी विनंती केली. यामागे, ही नोकरी स्वीकारल्यास आपल्याला प्रशासकीय कामाचा अनुभव मिळेल, राजकारण जवळून पाहता येईल, मोठ्या व मातब्बर नेत्यांचा सहवास लाभेल हा त्यांचा हेतू होता.
राजकारणात या ८०-९० च्या दशकात प्रचंड उलथापालथ झाली. याचा परिणाम पुलोदवर देखील झाला. पक्षातील ६० पैकी केवळ ६ आमदार शिल्लक राहिले. पवारांनी पक्षबांधणीसाठी महाराष्ट्र पिंजून काढला. या काळात त्यांच्यासोबत पूर्णवेळ होते, ते म्हणजे दिलीपराव वळसे पाटील. त्यांनी पवारांच्या स्वीय सहाय्यकाचं काम तब्बल ८ वर्षे केलं. पुढे परिस्थिती बदलली, शरद पवार पुन्हा मुख्यमंत्री बनले.
यावेळी त्यांनी दिलीपराव वळसे पाटलांना बोलावून घेतलं आणि विचारलं, “तुला राजकारणात यायचं आहे की मंत्रालयात काम करायचं आहे?” दिलीप वळसे पाटलांनी त्यांचा निर्णय पवारांना सांगितला आणि १९९० साली जेष्ठ आणि लोकप्रिय आमदार किसन राव बाणखेले यांना हरवून ते विधानसभेत आले. वळसे पाटलांची दुसरी इनिंग सुरु झाली.
अशा या प्रामाणिक आणि विश्वासू नेत्याच्या हातात, आज पवारांनी सगळ्या नेत्यांना डावलून गृहमंत्री पदाची सूत्र सोपवली आहेत.