
मराठवाड्यातील पाणी टंचाई असलेल्या जिल्ह्यांना पाणी देण्यासाठी पर्याय शोधा; जयंत पाटलांच्या सूचना!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील हे आपल्या खात्याला न्याय देण्याचे काम आपल्या कार्यशैली मधून करत आहेत. महाराष्ट्र हा पाण्याच्या बाबतीत सुजलाम-सुफलाम झाला पाहिजे म्हणून काम करताना दिसून येत आहेत. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाण्याची तीव्र अडचण असणाऱ्या जिल्ह्यांचा, तालुक्यांचा व भागांचा अभ्यास करा तसेच या भागांना पाणी देण्यासाठी पर्याय शोधा, असे निर्देश जयंत पाटील यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले.
सिल्लोड तालुक्यातील जलसंपदा विभागाच्या प्रश्नांच्या बाबत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समवेत बैठक झाली. या बैठकीमध्ये भराडी बृहत लघु पाटबंधारेसंदर्भात सर्वेक्षण करण्याबाबत चर्चा झाली. त्याचे सर्वेक्षणाचे काम लवकर पूर्ण करावे, असे निर्देशही मंत्री जयंत पाटील यांनी दिले. तसेच मराठवाड्यातील अजिंठा, अंधारी मध्यम प्रकल्प व लघु प्रकल्पातील अतिरिक्त वाहून जाणारे पाणी व अशा आदी प्रकल्पांच्या बाबतीत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रकल्पांची दुरुस्ती देखभाल व नव्याने पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राबवता येणार्या उपाय योजना यावरती चर्चा संपन्न झाली.