फडणवीस मंत्रीमंडळ : राहुल कुल की महेश लांडगे… कुणाला मिळणार संधी?

0

 

पुणे । विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले. मावळते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. त्यानिमित्ताने नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात पुणे जिल्ह्यातून कुणाला संधी मिळणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघांमध्ये १२ ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विचारांचे आमदार आहेत. ९ ठिकाणी भाजपाच्या विचारांचे आमदार असले तरी, जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार, शिक्षण संस्थांवर राष्ट्रवादी व काँग्रेसचे वर्चस्व आहे. जिल्ह्यात भाजपाचा प्रभाव वाढवायचा असेल, तर  मावळते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तोडीचा  नव्या दमाच्या आणि लोकांमध्ये मिसळून काम करणाऱ्या चेहऱ्याची भाजपाला नितांत आवश्यकता आहे.

सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा प्रभाव सर्वाधिक दिसतो. या भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वाधिक लक्ष केंद्रीत करतील. भाजपा वाढवण्यासाठी आणि ग्रामीण भागातील घराघरांत भाजपाचा विचार रुजवण्यासाठी फडणवीस त्याच ताकदीच्या चेहऱ्याला मंत्रीमंडळात स्थान देतील, हे निश्चित आहे.

सध्यस्थितीला पुणे जिल्ह्यातील प्रदेशाध्यक्ष, कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष व  आमदार महेश लांडगे आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांची नावे चर्चेत आहेत. राजकीय पटलावर संबंधित तिघांचा तुलनात्मक विचार होणार यात शंका नाही. त्यानिमित्ताने कोणाची बलस्थाने आणि आव्हाने काय आहेत? याचा आढावा घेण्याचा प्रयत्न फडणवीस करतील, असे राजकीय जाणकारांचे निरीक्षण आहे.

कोथरुड विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. २०१४ मध्ये भाजपा सत्तेत आल्यानंतर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री म्हणून कारभार सांभाळला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्ती म्हणून भाजपात विशेष दबदबा आहे. तसेच, मूळचे कोल्हापूरशी संबंधित असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी मोठी जबाबदारी देण्याबाबत विचार होवू शकतो. कोथरुड मतदार संघातून निवडून आले असले तरी, पुणेकरांनी अद्याप चंद्रकांत पाटलांचे नेतृत्व स्वीकारलेले नाही. पाटील यांना पुण्यातूनच मोठा विरोध होत असतो.

पिंपरी-चिंचवडमधील भोसरी मतदार संघातून २०१४ मध्ये अपक्ष निवडणून आले आहेत. २०१९ मध्ये भाजपाच्या तिकीटावर राज्यातील भाजपा आमदारांमध्ये सर्वाधिक मतांनी निवडून आले आहेत. २०१७ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका विजयात मोलाचे योगदान दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक अशी भाजपात ओळख आहे. बैलगाडा शर्यत, इंद्रायणी थडी जत्रा, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आदींमुळे महाराष्ट्रभरात लोकसंपर्क आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात नातीगोती आणि कामगार संघटनेच्या माध्यमातून मावळ, खेड, शिरूर, आंबेगाव, जुन्नर, मुळशी, हवेली आदी तालुक्यांमध्ये प्रभाव असलेले नेता म्हणून ओळखले जातात. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय पक्षामध्ये कोणताही ‘गॉडफादर’ नाही. सहकार आणि शिक्षण क्षेत्रात स्वत:च्या मोठ्या संस्था नाहीत. काँग्रेसमधून राजकीय वाटचाल सुरू केलेले लांडगे राष्ट्रवादीत काहीकाळ स्थिरावले त्यानंतर अपक्ष निवडून आले.  स्वयंभू राजकीय वाटचाल असल्यामुळे कोणत्याही बड्या नेत्याचा वरदहस्त किंवा कुटुंबात कोणताही राजकीय वारसा नाही.

दौंड मतदार संघातून तीनवेळा निवडून आलेले सुभाष कुल आणि एकदा निवडून आलेल्या रंजना कुल यांचे मुलगा म्हणून राहुल कुल यांची विशेष ओळख आहे. २०१४ मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष आणि २०१९ मध्ये भाजपाच्या तिकीटावर कुल यांनी बाजी मारली. त्यांच्या पत्नी कांचन कुल या मावळते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईक आहेत. तसेच, कांचन यांना बारामती लोकसभा मतदार संघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. तसेच, दौंड वगळता पुणे जिल्ह्यात जनसंपर्क नाही. त्यांच्या भीमा पाटस साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारखान्याला मदत करुनही कुल कारखाना सुरू करु शकले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. २०१९ मध्ये निसटता विजय मिळला. सलग सहावेळा एकाच कुटुंबात आमदारकी असल्यामुळे घराणेशाहीचा आरोप होत असतो.

 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.