इंग्लंडने टी-20 वर्ल्ड कपवर दुसऱ्यांदा कोरले नाव, पाकिस्तानची निराशा

- Vaishnav Jadhav

0

T-20WorldCup : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाला चारी मुंड्या चीत करताना इंग्लंड संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. इंग्लंड संघाने तब्बल 12 वर्षांनंतर दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकला. पाकिस्तान संघाचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे.

इंग्लंड संघाचा कर्णधार जॉस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना सावध सुरुवात केली. मात्र, नंतर ठराविक अंतराने पाकिस्तान संघाचे फलंदाज बाद होत गेल्याने 20 षटकात पाकिस्तानचा डाव 8 बाद 137 धावांवरच रोखला गेला. यामध्ये पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने 32, तर शान मसूदने सर्वाधिक 38 धावा केल्या. इतर फलंदाजांनी निराशा केली. इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज सॅम करनने 4 ओव्हरमध्ये 12 धावा देताना 3 विकेट घेतल्या. आदिल रशीद व ख्रिस जाॅर्डन यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले, तर बेन स्टोकने 1 बळी घेतला आहे.

इंग्लंड संघाने प्रत्युत्तर देताना, इंग्लंडचा गेल्या सामन्यातील हिरो एलेक्स हेल्स 1 धावेवर बाद झाला. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला. मात्र, दुखापतीमुळे शाहिन आफ्रिदीला मैदान सोडावे लागले. इंग्लंड संघाचा कर्णधार बटलरने 26, तर बेन स्टोक्सने शानदार अर्धशतक (नाबाद 52) झळकावत इंग्लंड संघाला दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवून दिले. पाकिस्तानच्या हॅरिस रौफने दोन विकेट घेतल्या.

सोबतच, मेलबर्न मैदानात 1992 साली पाकिस्तानने इंग्लंडला हरवून वर्ल्ड कप जिंकला होता. त्याच पराभवाची इंग्लंडने परतफेड करत टी-20 वर्ल्डकपवर इंग्लंड संघाने दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलं आहे. या विजयात इंग्लंड संघाचा बेन स्टोक्स विजयाचा शिल्पकार ठरला आहे. त्याने 49 चेंडूत नाबाद 52 धावांची खेळी केली. इंग्लंडने पाच विकेटने वर्ल्ड कप जिंकला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.