
जुलमी मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसचा एल्गार; राज्यात १० दिवसाच्या आंदोलनाचा धडाका!
देशभरातील तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. महागाईमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल अशा महत्वपूर्ण गोष्टींच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. या महागाई विरोधात महाराष्ट्र काँग्रेसने एल्गार पुकारला आहे तब्बल दहा दिवस विविध आंदोलनाच्या रूपाने मोदी सरकार विरोधात एल्गार करण्यात येणार आहे याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
पत्रकार परिषदेत बोलत असताना नाना पटोले म्हणाले की ‘उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून देशातील गरिब जनतेच्या घरी मोफत गॅस देण्याच्या नावाखाली मोदींनी त्यांची फसवणूक केली आहे. गॅस कनेक्शन देऊन त्यांचे रॉकेल बंद केले आणि आता ८५० रुपयांचे गॅस सिलिंडर घेणे या गरिब कुटुंबांना परवडत नाही. मोदी सरकार शेजारच्या नेपाळ, भुतान, बांग्लादेशाला पेट्रोल ३० रुपये लिटर व डिझेल २२ रुपये लिटरने देते आणि आपल्या नागरिकांना मात्र त्याच पेट्रोल डिझेलसाठी १०० रुपये मोजावे लागतात. मोदी सरकारने केलेल्या या कृत्रिम महागाईने वाहतुकीसह इतर वस्तुंचीही महागाई झाली आहे. सामान्य माणसाचे जगणे कठीण करुन ठेवले असून त्याच्या विरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून या जुलमी, अत्याचारी सरकारचा निषेध करणार आहे’. अशी त्यांनी माहिती दिली.
बोलत असताना नाना पटोले म्हणाले की या आंदोलनामध्ये गुरुवारपासून ते स्वतः सहभागी होणार आहेत. नाना पटोले हे नागपूरमध्ये मंत्री नितीन राऊत सुनील केदार यांच्यासह सायकल यात्रा काढणार आहेत. या आंदोलनामध्ये काँग्रेसचा सर्व फ्रंटलचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत अशी माहिती त्यांनी बोलत असताना दिली.