आज फडणवीस जे करत आहेत, ते विरोधी पक्षनेत्याकडून अपेक्षित नाही

0

जळगाव : बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी, राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पातळी सोडून केलेल्या टीकेचे पडसाद आज दिवसभर राज्यात उमटत आहेत.

यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी देखील विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत, विरोधकांना सरकारसोबत एकत्र येत काम करण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्रावर जेव्हा संकट आले, जसे की किल्लारीचा भूकंप असो, मुंबईमध्ये झालेला २६/११ दहशतवादी हल्ला किंवा ९३ च्या बॉम्बस्फोटांची मालिका असो, अशा अनेक कठीण प्रसंगाच्या वेळेस राजकारण बाजूला ठेऊन विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष यांनी हातात हात घालून कामं केली आहेत. त्या कालखंडामध्ये मी देखील विरोधी पक्षात होतो, विरोधी पक्षनेता होतो. पण कधीही अशा संकटामध्ये आम्ही कुत्र्या-मांजराचा खेळ खेळलो नाही. आज फडणवीस जे करत आहेत ते विरोधी पक्षनेत्याकडून अपेक्षित नाही, अशी टीका त्यांनी फडणवीसांवर केली आहे.

सध्या राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभर करोनामुळे परिस्थती हाताबाहेर गेली आहे. प्रत्येक दिवसाला देशात दोन लाखांच्याहून अधिक करोना बाधित रुग्ण सापडत आहेत. तसेच देशात सगळीकडेच बेड्स, ऑक्सिजन सोबतच रेमेडीसीवर या करोना रोगावर गुणकारी असणाऱ्या इंजेक्शन्सचा देखील तुटवडा जाणवत आहे. यावरून राज्यात सत्ताधरी आणि विरोधक यांच्यात राजकारण सुरु आहे.

दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून, काल दिवसभरात राज्यात ६७ हजार १२३ करोना रुग्ण सापडले आहेत, तर ५६ हजार ७८३ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. मात्र या दरम्यान, काल राज्यात ४१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.