पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेवरील गोळीबार प्रकरणाला नाट्यमय वळण

0

पिंपरी-चिंचवडमधील कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराला सत्तेचा गैरवापर करीत ‘ब्लॅकमेलिंग’ करणाऱ्या आमदारांनी प्रकरण अंगलट येण्याची भिती निर्माण झाल्यावर स्वत:वर गोळीबार केल्याचा कांगावा केल्याचे दिसत आहे. याच प्रकरणात पिंपरी विधानसभेतील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे आणि पुत्र सिद्धार्थ बनसोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत मुंबईतील प्रथितयश असलेली ए.जी. एनव्हायरो कंपनीकडे कचरा संकलनाचे काम आहे. या कंपनीचे शहरातील इनचार्ज माजी सैनिक तानाजी पवार आहेत. आपल्या मर्जीतील मुलांना कामावर  न येता पगार चालू करा, कचरा संकलनासाठी आमच्या गाड्या घ्या यासह पैशाची मागणी करीत आमदार बनसोडे यांनी तानाजी पवार यांना धमकावले होते. गेल्या १५ दिवसांपासून हा विषय चर्चेत होता.

पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे कथित गोळीबार प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. कंत्राटदार अँथोनी यांचा मॅनेजर तानाजी पवारसह तिघांवर जीवे मारण्याच्या उद्देशाने आमदार आणि त्यांच्या मुलाच्या दिशेने गोळीबार केल्याचा आरोप आहे. तर आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे आणि त्यांच्या पीएसह 21 जणांवर अपहरण आणि जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप तानाजीने केला आहे.

 

गोळीबार झाला पण कोणीच जखमी झाले नाही?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाला. झाडलेल्या दोन्ही गोळ्यांमधून आमदार सुखरुप बचावले. घटनास्थळी 20 ते 20 कार्यकर्ते उपस्थित होते, त्यापैकी कोणीही जखमी नाही. तानाजी हे ‘सीआरपीएफ’चे निवृत्त जवान आहेत. पोलिसांनी तातडीने तानाजीला अटक केली. पण गोळी ना आमदारांना, ना उपस्थितांना लागली मग गोळीची खूण शोधण्याचं काम सुरु झालं. पण काही केल्या पोलिसांना ती खूण सापडत नव्हती, ही बाब विचार करायला लावणारी आहे. आमदार बनसोडे आणि तानाजी पवार यांच्यामधील 11 मे रोजी फोनवरुन झालेल्या संवादाची क्लिप समोर आली. यात आमदार शिवीगाळ करुन तानाजीला धमकावत आहेत. अँथोनी यांच्या आकुर्डी येथील कार्यालयासमोर 11 मे रोजी घडलेल्या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले. यात आमदार पुत्र सिद्धार्थ, त्यांच्या पीएसह दहा जणांनी कार्यालयात प्रवेश केला. जमावबंदी कायदा लागू असताना गोंधळ घातला. तिथेच घातक शस्त्राने दोघांवर हल्ला झाला. हे सीसीटीव्हीमधील दृश्यांनी समोर आणलं. या आधारावर आमदार पुत्र सिद्धार्थ, त्यांच्या पीएसह दहा जणांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी निगडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. वरील सर्व घटनांचा विचार केला असता ठेकेदारावर दबाव निर्माण करुन आर्थिक हित जोपासण्यासाठी झालेला प्रकार चव्हाट्यावर आला आहे.

 

कार्यकारी अभियंत्याच्या दबावामुळे ठेकेदारचा अपघाती मृत्यू?

राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आहे. राज्यात सत्तेत असलेल्या पक्षांतील स्थानिक नेत्यांना २०१९ पासून मोठी ताकद मिळाली आहे. महापालिकेच्या ऑटो क्लस्टर कोविड केअर सेंटरमधील ‘स्पर्श’ संस्थेच्या प्रकरणात राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचे नाव येत आहे. दुसरीकडे, आमदार अण्णा बनसोडे यांचे प्रकरण समोर आले. विशेष म्हणजे, शहरातील एक आमदार, माजी महापौर यांनी कार्यकारी अभियंता याच्या मार्फत ठेकेदावरावर आणखी एका प्रकरणात दबाव निर्माण केला. संबंधित ठेकेदाराच्या कुटुंबीय कोविड पॉझिटीव्ह होते. राजकीय दबाव, काम जाण्याची भिती या तणावातच गावाकडून पुण्याच्या दिशेने निघालेल्या संबंधित ठेकेदाराच्या गाडीला मोठा अपघात झाला. या अपघातात संबंधित ठेकेदाराचा जीव गेला आहे. ठेकेदाराच्या कुटुंबियांनी याविरोधात आवाज उठवला तर तो आमदार, माजी महापौर याच्यासह सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची ‘सेटलमेंट’ करुन देणारा कार्यकारी अभियंता अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.