
‘द इंटर्न’ चं पोस्टर प्रदर्शित, ऋषी कपूर यांच्या जागी अमिताभ बच्चन यांची वर्णी.
बॉलीवूडचे दिग्गज कलाकार अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री दीपिका पदूकोण पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. याआधी दोघांनी ‘पीकू’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यातील त्यांची बाप आणि मुलीची जोडी ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता पुन्हा अमिताभ आणि दीपिका ‘द इंटर्न’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट ‘द इंटर्न’ चा हिंदी रिमेक आहे.
या चित्रपटात आधी दिवंगत अभिनेते ऋषी कपूर ही भूमिका साकारणार होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर आता ही भूमिका अमिताभ बच्चन साकारणार आहेत. दीपिकाला पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळत असल्याने ती अतिशय खुश असल्याचं तिने म्हंटले आहे.
दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये अमिताभ आणि दीपिका दिसत आहेत. “माझे सर्वात खास सहकलाकार अमिताभ बच्चन यांच्यासोबत पुन्हा एकदा काम करायला मिळणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. ‘द इंटर्न’च्या बॉलिवूड रिमेकमध्ये तुमचं स्वागत आहे”, अशा आशयाचे कॅप्शन दीपिकाने ते पोस्टर शेर करत दिले आहे.
‘द इंटर्न’ या चित्रपटाचे पोस्टर पाहून चाहते देखील हा चित्रपट पडद्यावर पाहावयास कधी मिळणार या अतिप्रतिक्षेत आहेत. या चित्रपटाबद्दल अधिक उत्साहाचं वातावरण त्यांच्यामध्ये पाहिला मिळत आहे.