
कोरोनाची तिसरी लाट गंभीर, एकही व्यक्तीचा मृत्यू होऊ देणार नाही, धनंजय मुंडे यांचा संकल्प!
महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र लवकरच तिसरी लाट येण्याची संभाव्य शक्यता वर्तविण्यात येते आहे. या दृष्टीकोनातून राज्य सरकार युद्धपातळीवरती काम करताना दिसून येत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये एकाही व्यक्तीचा मृत्यू होऊ देणार नाही असा संकल्प सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे.
तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी परळी सज्ज असल्याचे धनंजय मुंडे यांनी एका आयोजित कार्यक्रमामध्ये सांगितले. कोरोनामुळे होणारे नागरिकांचे मृत्यू कसे रोखता येतील या दृष्टीने महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे. अधिकचे पैसे रुग्णालयाकडून आकारले जाऊ नयेत, यादृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्येक रुग्णालयांलया मधील बिलाचे रेकॉर्ड तपासण्याचे संकेत दिले आहेत.
परळी शहरातील हलगे गार्डनमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या 24 तास सेवा देणाऱ्या हातांचा गौरव, ‘सेवा गौरव समारोहा’ च्या माध्यमातून पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. या वेळी कार्यक्रमामध्ये डॉक्टर्स, आरोग्य सेवक, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, पत्रकार यांसह कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या दूतांचा गौरव करण्यात आला.