
काँग्रेसचा भाजपला धक्का; पटोलेंच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
महाराष्ट्र काँग्रेस जबरदस्त तयारीने मोर्चेबांधणी करत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रभरात जोरदार तयारीने आंदोलने, मेळावे तसेच पक्ष संघटना वाढीचे काम होताना दिसून येत आहे. लोकांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे मरगळलेल्या काँग्रेसमध्ये नवचैतन्य आल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत आंबेडकर चळवळीचे नेते मिलिंद अहिरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत भाजप पक्षातून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सोबतच नागपूर कारागृहाचे निवृत्त अधिक्षक हिरालाल जाधव यांनी त्यांच्या सहकार्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या प्रवेशाच्या नंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चांगलाच भाजपा वरती हल्लाबोल चढवला आहे.
नाना पटोले म्हणाले की ‘भारतीय जनता पक्ष नेहमी सत्ता मिळविण्यासाठी निवडणुकीच्या वेळी अनेक समाजातील नेत्यांना खोटे आश्वासने देऊन पक्षात समाविष्ट करून घेतात, परंतु फक्त निवडणुकीपुरताच भाजप त्यांचा वापर करते. मिलिंद अहिरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी योग्य वेळी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना काँग्रेस पक्षात योग्य स्थान देऊन त्यांना मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेण्यात येईल. हिरालाल जाधव यांच्या अनुभवाचा काँग्रेस पक्षाला फायदा होणार आहे,’ असे मत त्यांनी या वेळी बोलताना व्यक्त केलं.