
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई : राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ६० हजारांवर गेली असून, त्यामुळे राज्यात आरोग्य यंत्रणांची भंबेरी उडाली आहे. राज्यात इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका, ऑक्सिजन, करोना लस अशा आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे.
या ‘भूतो न भविष्यती’ अशा परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी, मुख्यमंत्र्यांनी राज्यात १५ एप्रिलपासून १ मे च्या सकाळपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्यात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, या कडक निर्बंधांचे पालन संपूर्ण राज्यात योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध तीव्र कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. यावेळेस त्यांनी प्रशासनाला सूचना देताना, कोणत्याही परिस्थितीत बेफिकीर राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी पसरला तर आपल्याला परवडणार नाही, असे देखील सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केले की, जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत, मात्र नियम मोडले जात असतील किंवा विनाकारण गर्दी केली जात असेल, तर त्या सुविधा बंद करण्याचा पूर्ण अधिकार स्थानिक प्रशासनाला आहेत. सूचना दिल्या आहेत.