सुशांत सिंग खटल्यात आरोपपत्र दाखल

0

अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करणार्‍या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) शुक्रवारी मुंबईतील एनडीपीएस न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यात सुमारे १२ हजार पाने आहेत. आरोपपत्रात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती, तीचा भाऊ शोविक यांच्यासह ३३ आरोपींची नावे आहेत. ५ आरोपी फरार असल्याचे समजते. अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांच्या निवेदनाचाही या कागदपत्रांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

चार्जशीटसह ५० हजार पृष्ठांचे डिजिटल पुरावे आहेत. यात आरोपींमधील व्हॉट्सअॅप चॅट, त्यांचे कॉल डेटा रेकॉर्ड आणि बँक कागदपत्रांसह अन्य पुरावे समाविष्ट आहेत. त्यात २०० हून अधिक साक्षीदारांच्या निवेदनांचादेखील समावेश करण्यात आला आहे.
या प्रकरणात, ३३ लोकांना एनसीबीने अटक केली होती. यामध्ये रिया, तीचा भाऊ शोविक, सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत आणि अनेक ड्रग पेडलर्स यांचा समावेश आहे. दुसर्‍या एका प्रकरणात एनसीबीने बॉलिवूडमधील काही नामांकित अभिनेत्रीची या प्रकरणात संवाद साधल्यानंतर चौकशी केली गेली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुख्य आरोपपत्राच्या तीन महिन्यांनंतर एनसीबी पूरक आरोपपत्रदेखील सादर करू शकते, ज्यात बॉलिवूडमधील अनेक नामांकित व्यक्तींची नावे असू शकतात.सुशांतच्या मृत्यूच्या दोन महिन्यांनंतर त्याच्या वडिलांनी पाटण्यात गुन्हा दाखल केला होता. हा खटला सुशांतची मैत्रीण रिया आणि रियाच्या कुटुंबातील सदस्यांसह ५ जणांविरूद्ध होता. या सर्वांवर सुशांतकडून १७ कोटी रुपये हडपल्याचा आरोप होता. यानंतर हे प्रकरण मुंबईत हस्तांतरित करण्याची विनंती रियाने सर्वोच्च न्यायालयात केली.

हा खटला सीबीआयकडे सोपविला.त्या वेळी या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) प्रवेश झाला आणि रियाच्या व्हॉट्सअॅप चॅटच्या तपासणीत ड्रग्सचा एक अँगल समोर आला. ड्रग्जसंदर्भात चॅट मिळाल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने प्रवेश केला आणि बॉलिवूडमध्ये चालणार्‍या मोठ्या रॅकेटचा भंडाफोड करण्यात आला.

१४ जून २०२० रोजी सुशांतचा मृतदेह त्याच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये पंख्याला लटकलेला आढळला. या प्रकरणातील शवविच्छेदन अहवालात मृत्यू संशयास्पद असून सुशांतचा खून करण्यात आला होता असे सांगण्यात आले. मात्र नंतरच्या एम्सच्या अहवालात ही आत्महत्येची घटना असल्याचे नमूद केले गेले होते.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.