
चंद्रकांत पाटील निरागस आणि निष्कपट – संजय राऊत
चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संजय राऊत यांनी स्पेशल अशा शुभेच्छा त्यांना शाब्दिक चिमटे काढत दिल्या आहेत. संजय राऊत म्हणाले की “चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी वाढदिवस साजरा करावा. घरी गोडधोड खावं. कार्यकर्त्यांनी आणलेले केक कापावेत, विशेष लहान मुलाप्रमाणे चंद्रकांत पाटलांकडे पाहावे. चंद्रकांत पाटील अत्यंत गोड माणूस आहेत. ते अत्यंत निरागस आणि निष्कपट आहेत. लहान मुलं कसं बडबड करतं तसा आनंद घ्यायचा असतो” असे म्हणत संजय राऊत यांनी मजेशीर टिप्पणी केली आहे.
तसेच काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर पण संजय राऊत बोलले. चंद्रकांत पाटील म्हणाले होते की ‘आम्ही जंगलात असणाऱ्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही’
या वर संजय राऊत म्हणाले, “शिवसेना काय आहे, कोण वाघ आहे हे देशाने पाहिले आहे. या वाघांची जातकुळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून कळते. वाघाने तुम्हा सगळ्यांना खेळवले आणि लोळवले सुद्धा आहे” असे प्रत्त्युत्तर संजय राऊत यांनी दिले आहे.