पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाची निदर्शने

- भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची उपस्थिती

0

पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांवर अत्याचार केला जात आहे. या घटनांचा निषेध करीत पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वतीने मंगळवारी निदर्शने करण्यात आली.

यावेळी शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस राजू दुर्गे, नगरसेवक कुंदन गायकवाड, प्रसिद्घीप्रमुख संजय पटनी आदी उपस्थित होते.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरू केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत. या राजकीय हिंसाचाराचा प्रकार म्हणजे लोकशाहीचा खून आहे, असा संताप आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला. यावेळी तृणमूल काँग्रेसचा धिक्कार असो… पश्चिम बंगाल सरकारचा धिक्कार असो… अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी बोलताना आमदार लांडगे म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण चालू झाले आहे. ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे प्रकार घडत आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे, असे ते यावेळी म्हणाले.

‘त्या’ नेत्यांनी साधा निषेधही केला नाही…

पश्चिम बंगाल निवडणुकीत महाराष्ट्रातील पुरोगामी म्हणवणाऱ्या नेत्यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला. मात्र, त्याच बंगालमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरांची जाळपोळ झाली. ३० ते ३५ लोकांची हत्या झाली. यावर साधा निषेधही महाराष्ट्रातील नेत्यांनी नोंदवण्याची संवेदनशीलता दाखवली नाही, अशी टीका आमदार महेश लांडगे यांनी यावेळी केली.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.