राजीव गांधी यांच्या उपकारांची जाण ठेवत अटलबिहारी वाजपेयी जी म्हणाले होते…

0

अटल बिहारी वाजपेयी या नावातच एक कविता आहे. एक सुसंस्कृतपणा आहे. एक शालीनता आहे, नम्रपणा आहे. देशाच्या या महान नेत्याचे आजही स्मरण केले जाते आणि भारतीय राजकारणाच्या इतिहासात पुढेही केले जाईल. वाजपेयी जींचे अनेक किस्से त्यांच्या सहकाऱ्यांकडून आणि हितचिंतकांकडून आठवले जातात, सांगितले जातात. हा किस्सा देखील त्यांच्या नम्र आणि मृदू स्वभावाची आठवण करून देणारा आहे..

जेव्हा जेव्हा देशाच्या आणि हिंदुत्वाच्या बाजूने उभी राहण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी सर्वस्व झुगारून देऊन केवळ  राष्ट्र प्रेम आणि राष्ट्र हितासाठी राजकारण केले. जेव्हा राजधर्म शिकवण्याची वेळ आली तेव्हाही ते राष्ट्राच्या बाजूने उभे राहिले. खचितच त्यांनी आपल्या प्रतिमेचा निकृष्ट राजकारणासाठी भंग केला असेल. अशा या वाजपेयीजींनी एकदा एका पत्रकाराला ठणकावून सांगितल की, “मी जिवंत आहे ते राजीव गांधी यांच्या उपकारामुळेच.”

त्याचं झालं असं होतं की देशाचे पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली होती. आजच्या सारखंच त्याही वेळी एका पत्रकाराने बातमी साठी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना राजीव गांधींच्या हत्येसंदर्भात प्रश्न विचारला, तेव्हा वाजपेयी म्हणाले, आज मी जिवंत आहे ते फक्त राजीव गांधी यांच्या उपकारामुळे. तुम्हाला अस वाटत असेल की विरोधी पक्षनेता या नात्याने मी त्यांच्या विरोधात बोलेन तर ते मी यावेळी करणार नाही.

मात्र असं ते का म्हणाले? त्याचीही एक वेगळी गोष्ट आहे. या प्रसंगानंतर काही वर्षांनी जेष्ठ पत्रकार करण थापर यांनी घेतलेल्या मुलाखती दरम्यान, त्यांनी प्रसंगाचा सविस्तर खुलासा केला आहे. त्यात त्यांनी सांगितलं की, “मी किडनीच्या विकाराने ग्रस्त होतो आणि एकाच किडनीवर माझं शरीर सुरु होतं. त्यामुळे याचा माझ्या प्रकृती स्वास्थ्यावर परिणाम होत होता.

दरम्यान, डॉक्टरांनी त्यांना परदेशात जाऊन यावर उपचार घेण्याचे सुचवले, परंतु इतकी वर्षे राजकारणात असूनही वाजपेयींनी कधी पैसे कमवले नव्हते. त्यामुळे अमेरिकेत जाऊन उपचार घेणं त्यांना परवडणारं नव्हतं. हि गोष्ट हवेतून उडत तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींच्या कानावर पडली आणि अटलजींना त्यांनी बोलावून घेतलं.

केबिनमध्ये येऊन अटलजी उभे राहिले तेव्हा त्यांनी थेट अटलजींना सांगितलं की, तुमचा समावेश अमेरिकेला जाणाऱ्या भारताच्या प्रतिनिधी मंडळात करण्यात आला आहे. तुम्ही अमेरिकेच्या दौऱ्याला जात आहात. त्याचवेळी तुम्ही उपचार करुन घेवू शकता.

तसेच त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना देखील सूचना देऊन ठेवल्या होत्या की,  जो पर्यंत वाजपेयींच्या वरील उपचार पूर्ण होत नाहीत तो पर्यंत तिथला खर्च त्यांच्यावर पडू द्यायचा नाही. ऑपरेशन झाल्यावरच वाजपेयी परत भारतात येतील. वाजपेयी सांगतात या उपकाराची जाणीव ठेऊन त्यांनी नंतर कधीही मर्यादेच्या बाहेर जाऊन राजीव गांधींवर टीका केली नाही.

असे नेते सध्याच्या राजकारणात सापडणं महाकठीण आहे. त्यामुळे राजकारणात येऊ घातलेल्या युवकांनी आणि नेत्यांनी अशा मोठ्या नेत्यांकडून प्रेरणा घेऊन राजकारणाकडे पाहिल्यास, सामान्य जनता देखील राजकारणात येण्यापासून कचरणार नाही.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.