
राज्यातील आशा सेविकांचा संप मिटला, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या बैठकीमध्ये निघाला तोडगा!
महाराष्ट्रामध्ये आशा सेविकांनी केलेले कार्य फार मोठे आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये गावोगाव जाऊन वस्त्या वरती जाऊन रुग्णांची माहिती घेणे. तपासणी संदर्भात समुपदेशन करणे, रुग्णांची तापमान तपासणी करणे. अशा बहुतांश गोष्टी आशा सेविकांनी करत राज्य सरकारला मोठे सहकार्य केले आहे.
आशा सेविकांना अतिशय कमी मानधन मध्ये काम करावे लागत होते. मानधन वाढीची मागणी करत त्यांनी संप पुकारला होता. तसेच मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संप करण्याची त्यांनी घोषणा केली होती. महाराष्ट्रभरातून आशा सेविकांनी पुकारलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी दोन दिवसांपासून राज्य सरकार आणि संघटनेचे पदाधिकारी यांच्यामध्ये चर्चा सुरू होती.
१ जुलैपासून निश्चित मानधनात वाढ करुन एक हजार रुपये केलं जाणार असल्याची हमी आशा वर्कर्सना देण्यात आली आहे. आणि ५०० रुपये कोविड भत्ता देण्याचा निर्णय झाला आहे. त्यांच्या मागण्या वरती तोडगा निघाल्या नंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.