
आणि चक्क शरद पवारांची सभा अनिल देशमुखांनी उधळून लावली होती तेव्हा
सध्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिलेले अनिल देशमुख यांचे नाव, गेले कित्येक महिने या ना त्या कारणांमुळे सतत चर्चेत आहे. आधी मनसुख हिरेन प्रकरण, मग ‘एंटिलीया’ स्फोटकं प्रकरण, नंतर सचिन वाझे आणि नुकतेच झालेले परमबीर सिंग यांचे ‘लेटरबॉम्ब’ प्रकरण यांमुळे राज्याचे माजी गृहमंत्री चांगलेच अडचणीत आले होते.
अखेर काल मुंबई हायकोर्टाच्या एका सुनावणीच्या निकालानंतर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या मंत्री (गृह)पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, जेव्हा अनिल देशमुखांच्यावर गंभीर आरोप केले गेले, तेव्हापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी सगळीकडून जोर धरु लागली होती.
मात्र या सगळ्या घटना प्रसंगातही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, हे अनिल देशमुख यांच्या पाठीशी ठामपणे उभे असलेले पाहायला मिळाले. या एकट्या नेत्याने जाहीरपणे अनिल देशमुखांची बाजू लढवत ठेवली. पण एक काळ असा होता जेव्हा अनिल देशमुख यांच्या समर्थकांनी शरद पवार यांची सभा अक्षरशः उधळून लावली होती.
झालं असं होतं की, विधानसभा निवडणूक तोंडावर होती. सगळ्याच पक्षांच्या प्रचारसभांना धार आली होती. प्रत्येक पक्षाचा मोठा नेता राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन प्रचाराचे रान उठवत होता. भाषण करून मतांचा जोगवा मागत होता. याच पार्श्वभूमीवर शरद पवार देखील प्रचारासाठी विदर्भात आले होते.
पवारांची नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे सभा होणार होती. तिथले काँग्रेसचे उमेदवार सोनूबाबा उर्फ सुनील शिंदे हे पवारांचे त्याकाळचे कट्टर समर्थक मानले जायचे. त्यांच्या विरुद्ध निवडणुकीच्या मैदानात उभे होते, शेकापचे वीरेंद्र देशमुख आणि भाजपच्या प्रेरणाताई बारोकर. आणि या सगळ्यांसमोर अपक्ष म्हणून काँग्रेसचा बंडखोर उमेदवार देखील उभा होता, अनिल देशमुख.
अनिल देशमुख यांची ओळख म्हणजे ते काँग्रेसचे मोठे नेते रणजित देशमुख यांचे सख्खे चुलत बंधू. अनिल देशमुखांनी जवळपास ५ वर्षे काटोल विधानसभा मतदारसंघात आपल्या कार्यकर्त्यांचं जाळं विणलं होतं. त्यामुळे त्यांना तिथून काँग्रेसचं तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र त्यांच्या पदरी परत निराशाच आली. तिकीट सोनूबाबा उर्फ सुनील शिंदे यांनाच देण्यात आलं.
‘कांटे की टक्कर’ होणार होती. या निवडणुकीत अनिल देशमुख अपक्ष म्हणून उतरले. त्यांना चिन्ह मिळाले होते चष्मा. मग त्यांनी जोरदार प्रचार सुरु केला. पण शेवटी ते अपक्ष होते. प्रचारकाळात लोकांच्या तोंडी फक्त चष्मा हे चिन्ह कसे ठेवता येईल, याचा विचार त्यांच्या डोक्यात सुरु होता. हाच विचार त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बोलून दाखवला. कर्मधर्मसंयोगाने त्याचवेळी हिरो अक्षय कुमारचा ‘सुहाग’ हा सिनेमा आला होता. त्यातलं ‘गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा’ गाण सुपरहिट झालं होतं.
याचा फायदा घेण्यासाठीची एक सुपीक कल्पना त्यांच्या कार्यकर्त्यांच्यापैकी कुणाच्या तरी डोक्यात आली. आणि मग अनिल देशमुख जिथे जिथे प्रचाराला जायला लागले. तिथे तिथे हे गाणं वाजवायला कार्यकर्त्यांनी वाजवायला सुरुवात केली आणि बघता बघता अनिल देशमुखांचं ‘चष्मा’ चिन्ह लोकांच्या मनात उतरलं.
दुसरीकडे अपक्ष उमेदवार आपल्याला डोईजड जाणार हे लक्षात येताच, सुनील शिंदे यांनी काटोल मध्ये मुख्यमंत्री शरद पवार यांची सभा लावली. सभा सुरु झाली. या सभेला अनिल देशमुख यांचे देखील अनेक समर्थक गुपचुप हजर झाले. भाषण ऐन रंगत असतानाच एकाएकी पवारांना अनिल देशमुखांच्या समर्थकांनी अनेक प्रश्ने व जाब विचारून बेजार करायला सुरुवात केली. आणि एकाएकी गोंधळ वाढायला लागला. शेवटी मुख्यमंत्री शरद पवार यांना काटोल मधली प्रचारसभा थांबवावी लागली.
त्याकाळी शरद पवार हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या सभा उधळून लावणे दुरापास्तच पण त्यांना जाब विचारण्याची देखील कुणाची टाप नव्हती. पण अनिल देशमुखांच्या समर्थकांनी हा महापराक्रम करून दाखवला होता. त्यांनी जाब तर विचारलेच पण सभादेखील उधळून लावली. परिणामी त्यावर्षीच्या निवडणुकीत अनिल देशमुख प्रचंड मतांनी निवडून आले.
संपूर्ण महाराष्ट्रात अनिल देशमुख यांचं नाव गाजलं. स्वतः बाळासाहेबांनी त्यांना बोलावून युतीच्या सरकारमध्ये राज्यमंत्रिपद बहाल केलं. पुढे त्यांची शालेय शिक्षण व सांस्कृतिक राज्यमंत्रिपदाची कारकीर्द देखील गाजली. पण म्हणतात न ‘खेळ कुणाला दैवाचा कळला’, ज्या पवारांची सभा देशमुखांनी उधळून लावली होती, नंतर त्याच पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात अनिल देशमुख यांनी १९९९ सालच्या निवडणुकीत शिवसेनेची साथ सोडून प्रवेश केला. आज ते शरद पवारांच्या जवळचे म्हणून गणले जातात.