
” महाराष्ट्राच्या जनतेने गेल्या ५५ वर्षांत मला एक दिवसासाठीही रजेवर पाठवले नाही .” शरद पवारांच्या संसदीय कारकिरर्दिला ५५ वर्ष पूर्ण
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संशोधनानेच उद्याचे प्रश्न सोडवता येऊ शकतात. जैवतंत्रज्ञानाने कृषी आणि आरोग्य क्षेत्रात केलेले कार्य अतुलनीय असून भारतीय संशोधकांचे कौतुक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले.राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२१ डॉ. रेणू स्वरूप यांना प्रदान करण्यात आला.
केंद्रीय जैवतंत्रज्ञान विभागामध्ये डॉ. स्वरुप यांनी संशोधनाचे कार्य केले. या विभागाच्या त्या माजी सचिवदेखील होत्या. या पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी या वेळी डाॅ. स्वरूप यांच्या कार्याची ओळख करून दिली. शरद पवार यांच्या हस्ते ५ लाख रुपये आणि मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
संसदीय कार्याला ५५ वर्षे पूर्ण
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संसदीय कार्याला रविवारी ५५ वर्षे पूर्ण होत आहेत. या कार्यक्रमाचे निवेदक अंबरीष मिश्र यांनी याविषयी उल्लेख केल्यानंतर उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात पवारांचे अभिनंदन केले. याविषयी बोलताना पवार म्हणाले, ”महाराष्ट्राच्या जनतेने गेल्या ५५ वर्षांत मला एका दिवसासाठीही रजेवर पाठवलेले नाही यासाठी मी त्यांचा ऋणी आहे.”