
सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरी जाऊन कृषिमंत्री दादा भुसे यांनी घेतला जेवणाचा आस्वाद!
महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी धुळे जिल्ह्यामध्ये पीक पाहणी दौरा केला. या दौऱ्या मध्ये धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या बांधावर जात सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. ग्रामीण भागात जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावरच जणू ही बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये कमी पाण्यामध्ये उत्तम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हस्ते सत्कार सुद्धा संपन्न झाला. शेतकऱ्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने कमी पाण्यामध्ये नियोजनबद्ध कशा प्रकारे शेती केली आहे या संदर्भातील माहिती इतर शेतकऱ्यांना या वेळी देण्यात आली.
सोंडले या गावामध्ये कृषी अधिकाऱ्यांची व शेतकऱ्यांची बैठक पार पडल्यानंतर नंदुरबार च्या दिशेने मार्गस्थ होत असताना रस्त्यात एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या झोपडीमध्ये कृषिमंत्री दादा भुसे यांनी जेवण केलं. या जेवणाच्या वेळी शेतीच्या संदर्भात चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या हे मात्र विशेष.