शरद पवारांच्या एका पत्राने ममता बॅनर्जींना मिळालं बळ

0

पश्चिम बंगाल : इथे विधानसभा निवडणुकीसाठी आठ टप्प्यांमध्ये मतदान होत असून, राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय मैदानात नेते मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत असून, निवडणुकीला इथे चांगलाच रंग चढलेला आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जींना झालेला अपघात आणि त्या अनुषंगाने झालेले राजकारण, याचा फायदा आता कुणाला झाला आहे हे लवकरच कळेल. परंतु, या अपघातामुळे ममता बॅनर्जींचे धैर्य कुठेतरी खचले होते. परंतु याला बळ देण्याचे काम राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना एक पत्र पाठवून केले आहे.

ममता बॅनर्जी यांनी देशातील १५ राजकीय पक्षांना पत्र लिहून भाजपच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत देशातील बहुतांश राजकीय पक्षांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे. काही राजकीय पक्ष तर थेट ममता बॅनर्जी यांच्या प्रचारासाठी प.बंगालच्या रणांगणात उतरले आहेत.

काँग्रेसची प.बंगालमधील शक्ती बघता सर्व पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरोधी नारा बुलंद करावा आणि भाजपच्या विरोधात एकत्रितपणे लढाई लढावी, असं आवाहन ममता बॅनर्जी यांनी केलं होतं. आता त्यांच्या या पत्राला पवारांनी पत्र पाठवून पाठींबा दर्शवल्यामुळे प.बंगालच्या राजकारणात ममता बॅनर्जींच्या प्रचार अभियानात जोर वाढला आहे. त्याचवेळी ‘निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला पवारसाहेब जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली आहे.

याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. ‘शरद पवारसाहेबांचा 1 ते 3 एप्रिल असा पश्चिम बंगालचा दौरा होता. परंतु त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना जाता येणार नाही. मात्र पवारसाहेबांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाल्यास शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला पश्चिम बंगालला जातील,’ असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.