Posted in

“साहित्य संमेलनात राजकारणाचा रंग; नीलम गोन्हेंच्या आरोपांवर संजय राऊत संतप्त, शरद पवारांवरही टीका”

शिवसेना (शिंदे गट) नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पद मिळवण्यासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, असा खळबळजनक दावा केला आहे. दिल्लीतील ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला. त्यांच्या या वक्तव्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत संतप्त झाले असून, त्यांनी अखिल भारतीय साहित्य महामंडळाला पत्र लिहून निषेध नोंदवला आहे. त्यानंतर आता राऊत यांनी शरद पवारांवरही टीका केली असून, या आरोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

दिल्लीतील ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्वागताध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांना खुर्ची आणि पाणी देण्यावरून संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आता, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोन्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पदासाठी मर्सिडीज द्यावी लागत होती असा आरोप केल्यानंतर संजय राऊतांनी या प्रकरणावर सडकून टीका करत शरद पवारांवरही निशाणा साधला. ते पत्रकारांशी बोलत होते.

दिल्लीतील ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय चिखलफेक झाल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. “याची जबाबदारी पवार नाकारू शकत नाहीत, ते देखील याला तितकेच जबाबदार आहेत,” “शरद पवारांवर टीका होत असताना आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहतो, मग उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप होत असताना ते गप्प कसे?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच, नीलम गोन्हे कोण? ती कोणत्या शक्तीच्या इशाऱ्यावर आरोप करत आहे? असा प्रश्न विचारत, हे साहित्य संमेलन नसून राजकीय कट असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला. “सरकारकडून २ कोटी मिळतात आणि त्यातील २५ लाख खंडणी म्हणून घेतली जाते,” “कार्यक्रम साहित्य महामंडळ ठरवतं आणि आयोजकांना फक्त सतरंजी उचलण्याचे काम दिले जाते,” अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला.

दरम्यान, नीलम गोन्हे यांच्या विधानावर संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया देत त्यांना निर्लज्ज आणि भ्रष्ट असल्याचे आरोप केले. “हे विधान म्हणजे त्यांची विकृती आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, कोणती बाई पक्षात आणली? जाताना ही ताटात घाण करून गेली!” असा उल्लेख करत त्यांनी गोन्हेंवर बोचरी टीका केली. “नीलम गोन्हे या नमक हराम आणि भ्रष्ट आहेत. हा असंवैधानिक शब्द नाही,” असे स्पष्ट करत राऊतांनी त्यांच्यावर थेट प्रहार केला.