Posted in

“लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची संख्या फक्त २५% ठेवणार? महायुतीवर काँग्रेसचा गंभीर आरोप!”

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने ही योजना जाहीर केली आणि प्रभावी अंमलबजावणी केली. या योजनेच्या माध्यमातून महिलांना थेट आर्थिक मदत दिल्याने महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले. मात्र, निवडणुकीनंतर आता या योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी सुरू करण्यात आली आहे. यावरून काँग्रेसने सरकारवर टीका करत ही योजना केवळ मतांसाठीचा डाव असल्याचा आरोप केला आहे.

“लाडकी बहीण” योजनेतील लाभार्थींची संख्या आणखी ९ लाखांनी कमी होण्याची शक्यता असून, याआधीच ५ लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे एकूण अपात्र ठरणाऱ्या महिलांची संख्या १५ लाखांपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. सरकारकडून लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी सुरू असून, तिजोरीवरील वाढता आर्थिक भार लक्षात घेता ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीका करत महिलांची फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजनेवरून महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आरोप केला की, निवडणुकीपूर्वी मतं मिळवण्यासाठी सरकारने सरसकट महिलांच्या खात्यांवर पैसे जमा केले, मात्र आता विविध अटी लावून लाभार्थींची संख्या कमी केली जात आहे. सरकार ही योजना केवळ २५ टक्के महिलांपर्यंत सीमित ठेवण्याचे पाप करत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, सरकारकडे पुरेशी आर्थिक तरतूद नसतानाही पाच महिन्यांचे आगाऊ पैसे खात्यांवर टाकण्यात आल्याचे सांगत, महिलांना फसवण्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील निष्पाप महिलांची फसवणूक करून सरकारने मोठे महापाप केले असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी “लाडकी बहीण” योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर या घोषणेने तिजोरीवर मोठा आर्थिक दबाव वाढला आहे. पुढील महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून, या योजनेसाठी आवश्यक निधी कसा उभा केला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सध्या योजनेतील अपात्र लाभार्थींना वगळण्याची प्रक्रिया सुरू असून, मोठ्या प्रमाणात महिलांना या योजनेतून बाहेर करण्यात येत आहे.

Leave a Reply