बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, या प्रकरणाकडे मी पक्ष किंवा राजकारण म्हणून पाहिले नाही, तर ते माणुसकीच्या नात्याने पाहिले. याबद्दल त्यांनी म्हटले की, राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी माणुसकीच्या दृष्टिकोनातून ही घटना पाहिली पाहिजे. विशेषत: सुरेश धस यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, असेही सुप्रिया सुळे यांनी आपल्या वक्तव्याद्वारे स्पष्ट केले.
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर खासदार सुप्रिया सुळे आज मस्साजोग गावाला भेट देणार आहेत. सुळे (दि. १७) रोजी बारामती दौऱ्यावर होत्या, यावेळी त्यांनी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत सुळे यांना, “मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी सुरेश धस यांचा वापर झाला का?” आणि “सुरेश धस यांचे बिंग फोडण्यामागे राजकारण आहे का?” असा प्रश्न विचारला. यावर सुळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, सुरेश धस चॅनलवर पोटतिडकीने बोलत होते, आणि त्यांना असे वाटले होते की जोपर्यंत संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळत नाही किंवा बीडमधील गुन्हेगारी थांबत नाही, तोपर्यंत धस शांत बसणार नाहीत. माझी अशी अपेक्षा होती, अस त्यांनी सांगितल.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवणार का? या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की, माझी याकडे राजकारण म्हणून पाहण्याची इच्छा नाही. सहकारी संस्थेमध्ये राजकारणाची भूमिका येऊ नये, असे आम्हाला वाटते. तथापि, जर शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता असेल आणि शेतकऱ्यांना या निवडणुकीत सहभागी व्हायचं असेल, तर आमची पूर्णपणे पाठीशी उभं राहण्याची तयारी आहे अस सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान केल्यामुळे खासदार संजय राऊत यांची चिडचिड वाढल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, संजय राऊत यांची शरद पवारांविषयीची चिडचिड स्वाभाविक आहे, कारण त्यांचे शरद पवारांवरील प्रेम आणि हक्क देखील त्याच पातळीवर आहे. याशिवाय, त्यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) एकत्रित समन्वय घडवून आणण्याचे संकेत दिले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेचा निवडणूक निकालावर परिणाम झाला असल्याचे मान्य केले. तसेच, राज्यासमोरील आर्थिक संकटे आणि मोठ्या आव्हानांमुळे जाहीर केलेल्या योजनांची दीर्घकालीन कार्यक्षमता कशी असेल, हे काळ ठरवेल, असही त्यांनी सांगितले.