मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले अजित पवार यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ ओबीसी समाजातील विविध संघटना, आघाड्या आणि संस्थांच्या बैठका घेत आहेत. त्याच वेळी भुजबळ अजित पवार यांच्यावर टीका करत असून, त्यांची नाराजी व्यक्त करत आहेत. याच संदर्भात छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली, ज्यात समीर भुजबळ देखील उपस्थित होते. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे ४० मिनिटांची चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे, ज्यामुळे राजकीय हालचालींमध्ये नवे वळण येण्याची शक्यता आहे.
छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, ज्यात विविध राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ओबीसी समाजाने महायुतीला मोठे पाठबळ दिले आणि त्याचा या विजयात मोठा वाटा आहे. इतर घटकांच्या योगदानाचा देखील त्यांनी आदर केला, परंतु विशेषतः ओबीसी समाजाने दिलेल्या आशीर्वादाबद्दल सर्वांचे आभार मानले पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले. यावर छगन भुजबळ यांनी सांगितले की, फडणवीस हे ओबीसी समाजाचे नुकसान होऊ देणार नाहीत, आणि ओबीसींच्या हक्कांची काळजी घेतली जाईल.
राष्ट्रवादी काँग्रेसला पर्याय म्हणून भाजपामध्ये प्रवेश करणार का? असा प्रश्न पत्रकारांनी छगन भुजबळ यांना विचारला. यावर उत्तर देताना, भुजबळ यांनी सांगितले की, “यापेक्षा अधिक काही सांगू शकत नाही. यापूर्वी मी सर्व काही बोलून टाकले आहे.” तसेच, राज्यात सध्या सुरू असलेल्या घडामोडींबाबत भुजबळ यांनी माहिती दिली. मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत, आणि वातावरण बदलले आहे. फडणवीस यांनी भुजबळांना आठ ते दहा दिवसांचा वेळ देण्याची विनंती केली आणि सांगितले की, या कालावधीनंतर ते पुन्हा भेटून एक चांगला मार्ग शोधू शकतील. अस छगन भुजबळ यांनी सांगितले.
छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांना विनंती करत सांगितले की, “मी यावर साधक-बाधक विचार करतो आहे, हा निरोप ओबीसी घटकांना द्या आणि शांततेने या चर्चेला स्वीकारा.” दहा ते बारा दिवसांत चांगला मार्ग काढता येईल आणि त्यावर चर्चा केली जाईल. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या हिताचे आश्वासन देताना सांगितले की, ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाही आणि त्यांची नाराजी दूर करणे आवश्यक आहे, असे भुजबळ यांनी पत्रकारांना सांगितले.
दरम्यान, माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, ०३ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांची एक महत्त्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता आहे. या भेटीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मीडियाने प्रश्न विचारला. यावर अजित पवार यांनी उत्तर देताना स्पष्ट केले की, “तो आमचा पक्षांतर्गत प्रश्न आहे, आणि आम्ही तो आमच्या पद्धतीने सोडवू,” असे सांगत त्यांनी या विषयावर अधिक चर्चा करणे टाळले.