राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना वगळल्याने त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. “जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना” असे सूचक वक्तव्य त्यांनी केले, ज्यातून त्यांच्या मनातील असंतोष स्पष्ट झाला. यामुळे ते लवकरच बंड पुकारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर नाशिकमध्ये समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक झाली, जिथे भुजबळांनी कार्यकर्त्यांसमोर आपली भावना व्यक्त केली आणि एक मोठे आवाहन केले.
छगन भुजबळ यांनी नुकतीच नाशिक, येवला आणि लासलगाव येथील आपल्या भेटीबद्दल भाष्य केले. त्यांनी सांगितले की, येवला आणि लासलगावमध्ये लोकांना मोठा धक्का बसला आहे. मी त्यांना समजावलं आणि त्यांना धीर दिला. हे केवळ या भागातील लोकांचेच नाही, तर मागासवर्गीय, दलित आणि मुस्लिम समाजातील लोकांची देखील अशीच अवस्था आहे. भुजबळ म्हणाले की, देशभरातून लोकांनी मेसेज पाठवले आहेत आणि पंकज, समीर आणि कार्यकर्ते त्यांना उत्तर देत आहेत. आमच्या कार्यकर्त्यांना शहरात, जिल्ह्यात आणि राज्यात येण्याची मागणी सुरू झाली आहे.
कधी कधी शांत असलेल्या माणसांमध्ये अचानक एक आग पेटते, पण त्या वेळी संयम राखणे अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या मनातील दुख जाहीर करताना शिवीगाळ किंवा हिंसा करणे योग्य नाही. जे काही चाललं आहे, त्याबद्दल सर्वांना माहिती आहे, कारण मुख्यमंत्र्यांपासून सर्वांपर्यंत रोज सकाळी ८ वाजता राज्यातील स्थितीची ब्रिफिंग दिली जाते. तुम्ही निषेध करत असताना संयम ठेवावा आणि आपल्यासोबत दलित, मागासवर्गीय, मुस्लिम तसेच मराठा समाजही आहे. माझ्या निवडणुकीसाठी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचा मोठा हातभार होता. अस छगन भुजबळ म्हणाले.