रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांचे मंत्री समाविष्ट आहेत. नव्या चेहऱ्यांना संधी मिळाल्या, तर अनुभवी नेत्यांना संधी मिळाली नाही. यामध्ये छगन भुजबळ यांसारख्या अनुभवी नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. काल नाशिक आणि आज जालन्यात भुजबळ यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले.
छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याबद्दल आपली नाराजी जाहीर केली आहे. “मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, मला डावललं काय आणि फेकलं काय पण भुजबळ संपला नाही,” असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना समर्थन दिल्याचं बक्षिस मिळालं आहे अस सांगितल. मनोज जरांगे यांची मंत्रिमंडळ विस्तारावर पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात का स्थान मिळालं नाही हा आमचा प्रश्न नाही, असं स्पष्ट केलं. त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर अधिक बोलण्याचे टाळले, आणि म्हणाले, “माझ्या मराठा रक्षणाच्या लढ्यात मारेकऱ्यांशी काही देणं-घेणं नाही.” यावेळी त्यांनी सरकारवर मराठा आरक्षणाचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात मार्गी लावण्याचा दबाव टाकला. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचे समर्थन करत, “मराठा आरक्षण दिलं पाहिजे,” अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळवण्यासाठी मोठा लढा उभारला आहे. मात्र, छगन भुजबळ यांची भूमिका वेगळी आहे. त्यांना ओबीसीमधून आरक्षण नको आहे. ते इतर प्रकारे मिळावं अशी इच्छा आहे. यावरून दोन्ही नेत्यांमध्ये अनेक वेळा मतभेद समोर आले आहेत.