महाराष्ट्रात विधानसभेच्या निकालानंतर १२ दिवसांनी सरकार स्थापन झाले. मात्र, मंत्री मंडळाचा विस्तार अद्याप बाकी आहे. शिंदे गटातील आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत मंत्री पदासाठी आमदारांची धावपळ सुरू झाली आहे. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयी रॅलीनंतर नागपूरच्या राजभवनात मंत्री मंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मंत्री नेमण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्यातच, फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर शिंदे गट आणि मनसेचे आमदार पोहचल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
राज्यात सरकार स्थापन झाले तरी मंत्री मंडळाचे खाते वाटप अद्याप बाकी आहे. महायुतीतील खाती कोणाला मिळतील, याकडे लक्ष लागले आहे. भाजपाचे सर्वाधिक आमदार असल्यामुळे भाजपाच्या २० आमदारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदारांचा नंबर लागणार आहे. भाजपाच्या दिल्लीतील पक्ष नेत्यांनी अजून नावे ठरवली नाहीत, त्यामुळे मंत्री मंडळ विस्ताराला उशीर होण्याची शक्यता आहे. शिंदे गटातील काही मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची चर्चा आहे. आज शिंदे गट आणि मनसेचे आमदार सागर बंगल्यावर मंत्री पदासाठी पोहचले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर विविध राजकीय नेत्यांची धावपळ सुरू आहे. त्यात सातारचे शिवेंद्रराजे भोसले, कोल्हापूरचे आमदार राहुल आवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंके, भाजपचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिंदे गटाचे संजय शिरसाठ, माजी मंत्री संजय राठोड, आमदार कुमार आयलानी, मनसेचे राजू पाटील, आमदार संतोष दानवे आणि आमदार नमिता मुंदडा यांचा समावेश आहे. शिंदे गटाच्या काही नेत्यांची मंत्री पदासाठीची इच्छाशक्ती लक्षात घेत शिरसाठ आणि राठोड यांनी सागर बंगल्यावर पोहचल्याचे सांगितले जात आहे.