पिंपरी: आखाडा कोणताही असो… युद्ध असो… की राजकारण… एकदा का सैनिक-सहकाऱ्यांचे मनोबल खचले, सेनापती एकाकी पडतो. यासाठी प्रत्येक चाल अन् डाव हा राखून आणि पारखून खेळावा लागतो. अत्यंत संयमी आणि अभ्यासू अशी ओळख असलेले भोसरी विधानसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्याबाबत काही ‘कॅल्युलेशन’ चुकले. पवार यांची सभा झाल्यापासून मविआचे ‘टेन्शन’ वाढले आहे. परिणामी, पाच दिवसांत कार्यकर्त्यांचे ‘मॉरल’ खचले, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
विधानसभा निवडणुकीत भोसरीमध्ये महायुतीचे महेश लांडगे आणि महाविकास आघाडीचे अजित गव्हाणे यांची लढत तुल्यबळ होईल, असा दावा करण्यात येत होता. किंबहुना, गव्हाणे यांनी गेल्या ३ महिन्यांपासून तगडी लढत दिली. त्यांच्या प्रचाराच्या ‘टेम्पो’चा आलेख वाढता होता. पण, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेली सभा अपक्षेप्रमाणे परिणामकारक झाली नाही.
शरद पवार यांच्या सभेत विरोधी पक्षाचा उमेदवार म्हणून महेश लांडगेंचा उल्लेखही झाला नाही. या सभेत शरद पवार ‘वादळी’ बोलतील किंवा मावळात ज्याप्रमाणे काही महिन्यांपूर्वी आमदार सुनील शेळके यांना दम भरला होता. तसे काही हाती लागेल. याहून उत्तर पुणे जिल्ह्यात झालेल्या सभांमध्ये ज्याप्रमाणे शरद पवार यांचा त्याच दिवशी झंझावात होता. तो भोसरीत दिसेल, अशी अपेक्षा होती. महाविकास आघाडी आणि गव्हाणे समर्थकांची उत्सुकता प्रचंड होती. मात्र, सभेत शरद पवार यांनी स्थानिक उमेदवारावर बोलणेच टाळले. त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला. या सभेनंतर मतदार संघातील वातावरण खऱ्या अर्थाने महेश लांडगे यांच्या बाजुने झुकले.
चिखलीतील सभा ठरली ‘ट्रेलर’
दरम्यान, चिखली येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. ही सभा अपेक्षेप्रमाणे परिणामकारक होणार नाही, असाच महाविकास आघाडीचा कयास होता. मात्र, शरद पवारांच्या सभेनंतर महेश लांडगे समर्थकांचे मनोबल वाढले. चिखलीची सभा आक्रमक आणि झंझावाती झाली. या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी प्रलंबित असलेला रेड झोन, प्राधिकरण प्रॉपर्टी फ्री होल्डसह अन्य प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. तसेच, मुस्लिम समाजाच्या मौलवीचा व्हीडिओ जाहीर सभेत दाखवला आणि हिंदू समाजाला एकजूट करण्याचे आवाहन केले. ही सभा लांडगे आणि फडणवीस जोडीने गाजवली. महेश लांडगे यांच्यादृष्टीने ही सभा राजकीय वातावरण निर्मिचा ‘ट्रेलर’ होती. या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि महायुतीला मोठे बळ मिळाले. ‘फतवा विरुद्ध भगवा’ अशी गर्जना या सभेत करण्यात आली. त्यामुळे महाविकास आघाडी अस्वस्थता आणखी वाढली.