Posted in

तिन्ही पक्ष एकत्र काम करून पुन्हा महायुतीचे उमेदवार निवडून आणू

All Mahayutti workers are ready to bring the Mahayutti government again: Muralidhar Mohol

पुणे: राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असून, लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीसाठी ही महायुतीचे कार्यकर्ते सज्ज आहेत, असा विश्वास महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीची समन्वय समितीची बैठक आज कोथरुड मधील अंबर हॉल येथे संपन्न झाली.‌

या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केले. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार आणण्यासाठी महायुतीचे सर्व कार्यकर्ते सज्ज आहेत. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, राज्यात महायुतीची मोठी ताकद आहे. त्यामुळे ही ताकद एकवटून राज्यात पुन्हा सरकार आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात युतीची ताकद मोठी असल्याने; महायुतीलाच जनतेचा कौल मिळेल. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र आणि पुण्याचे महत्त्वाची भूमिका असेल, असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मराठा आरक्षणावर बोलताना नामदार पाटील म्हणाले की, राज्यातील मराठा समाजाला माननीय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे यांच्या काळात आरक्षण मिळालं. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण गेलं. त्यामुळे मनोज जरांगे यांनी आमची चुक काय झाली ते तरी सांगावं, असे आवाहन करुन मराठा समाज याचा सकारात्मक विचार करेल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आ. राहुल कुल, भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, ग्रामीणचे अध्यक्ष शरद बुट्टे पाटील, वासुदेवनाना काळे, शिवसेनेचे किरण साळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीपदादा गारटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष दिपक मानकर, रिपाइं आठवले गटाचे संजय सोनावणे, दिगंबर दुर्गाडे,दिपक मिसाळ, यमराज खरात, समन्वय समितीचे पुणे महानगर समन्वयक संदीप खर्डेकर यांच्या सह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.