विद्येचे आणि संस्कृतीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात मंगळवारी पहाटे एक धक्कादायक घटना घडली. स्वारगेट एसटी स्थानकात उभी असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर एका नराधमाने अमानुष अत्याचार केला. या पाशवी घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले असून महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राज्यभरातून या घटनेचा निषेध केला जात असून, विरोधकांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे.
स्वारगेट एसटी स्थानकातील अमानुष घटनेवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. “या घटनेची जबाबदारी सरकार आणि एसटी प्रशासनाने स्वीकारली पाहिजे. घटना घडली तेव्हा तिथे असलेली यंत्रणा नेमकी काय करत होती? रिकाम्या बसमध्ये आढळलेल्या बाबी धक्कादायक आहेत. त्या बस महिलांच्या शोषणासाठी वापरल्या जात होत्या का?” असा गंभीर सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली असून गृह विभागाची स्थिती वाईट झाली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
“सरकार सत्तेत दंग असून महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता नाही. या प्रकरणाचा मुद्दा आम्ही विधानसभा अधिवेशनात मांडू. गृह विभागाचा आणि कायद्याचा धाक उरला आहे की नाही, हा मोठा प्रश्न आहे,” असे ते म्हणाले. पुणे हे शिक्षणाचे आणि सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखले जात असले तरी महिलांसाठी अत्यंत धोकादायक शहर बनले आहे, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र शक्ती कायद्याची कठोर अंमलबजावणी त्वरित करावी आणि कायद्याचा प्रभाव दिसला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
राज्यात महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत असून अशा घटना वारंवार घडत आहेत. मात्र, सरकार या घटनांकडे गांभीर्याने पाहत आहे की नाही, हा मोठा प्रश्न आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. “सरकार केवळ घोषणा करत आहे ‘आम्ही कारवाई करू, आम्ही अटक करू’ पण प्रत्यक्षात काहीही घडत नाही. महिलांच्या शोषणाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, मात्र प्रशासन निष्क्रिय आहे,” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर तीव्र टीका केली.