Posted in

“पुण्यातील घटना लाजिरवाणी, आरोपीला कठोर शिक्षा होईल – अजित पवार”

पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकात मंगळवारी पहाटे शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अमानुष अत्याचाराची धक्कादायक घटना घडली. विद्येचे आणि संस्कृतीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात घडलेल्या या पाशवी कृत्याने संपूर्ण शहर हादरले असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, या घटनेवरून राजकीय वातावरणही तापले आहे. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवत कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवरील अमानुष अत्याचाराच्या घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक आणि सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी असल्याचे सांगत त्यांनी आरोपीला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही, असे स्पष्ट केले. या प्रकरणाचा तपास जलदगतीने व्हावा यासाठी त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना विशेष लक्ष घालण्याचे आणि आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली असून, महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील अमानुष अत्याचाराच्या घटनेची गंभीर दखल घेतली असून, पोलिसांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचन्या दिल्या आहेत. आरोपीला लवकरात लवकर अटक करून कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा केली जाईल, असा विश्वास त्यांनी राज्यातील नागरिकांना दिला. तसेच, पीडितेला न्याय मिळावा, मानसिक आधार मिळावा आणि आवश्यक ती सर्व मदत करण्यात यावी, यासाठी महिला व बाल विकास मंत्री आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना विशेष निर्देश देण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

दरम्यान, स्वारगेट बस स्थानकातील अत्याचाराच्या घटनेने सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अवघ्या १०० फुटांवर पोलिस चौकी, १८ सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षारक्षक असतानाही सराईत गुन्हेगार दत्तात्रय रामदास गाडे याने पीडित तरुणीच्या अज्ञानाचा आणि भाबडेपणाचा गैरफायदा घेत दोन वेळा अमानुष कृत्य केले. गाडेवर यापूर्वीही जबरी चोरीचे गुन्हे दाखल असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आठ विशेष पथके तैनात केली आहेत. तपासाच्या अनुषंगाने त्याच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, पीडितेवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलिसांकडून पुढील तपास जलदगतीने केला जात आहे.