Posted in

“ऑपरेशन टायगर’चा कोल्हापुरात जोर; माजी आमदार धनुष्यबाणासोबत, शिंदे कुणाला धक्का देणार?”

राज्यात सुरू असलेल्या “ऑपरेशन टायगर” मोहिमेअंतर्गत विविध पक्षांच्या नेत्यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश सुरूच आहे. याचा सर्वाधिक फटका उद्धव ठाकरे गटाला बसत असताना, कोल्हापूरमध्येही ही मोहीम वेग घेणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन अनेक नेते व कार्यकर्ते शिवसेनेत येण्यास इच्छुक असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने आणि माजी खासदार संजय मंडलिक यांनी सांगितले. लवकरच कोल्हापूरसह राज्यभरात नव्या प्रवेशांची मोठी लाट येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिंदेसेनेने सदस्य नोंदणी मोहीम सुरू केली असून, यासंदर्भात शासकीय विश्रामगृहावर बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्ह्यातील शिवसेनेचे संघटन आधीपासूनच भक्कम असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठबळामुळे संघटना अधिक बळकट होत असून, त्यांच्यामुळेच पालकमंत्रिपद मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्ह्यात संघटितपणे विक्रमी सदस्य नोंदणी केली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

माजी आमदार सुजित मिणचेकर लवकरच शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा शासकीय विश्रामगृहावर रंगली. संध्याकाळी ते या ठिकाणी उपस्थित होते आणि आपण केवळ सदिच्छा भेटीसाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांचा शिंदेसेनेत प्रवेश आता फक्त औपचारिकता उरल्याचे बोलले जात आहे. मिणचेकर पूर्वी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेत होते आणि नंतर त्यांनी राजू शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षात प्रवेश केला होता. सध्या ते गोकुळ संघाचे संचालक असून, त्यांच्या शिंदेसेनेतील संभाव्य प्रवेशाने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय संघर्ष तीव्र होत असताना, “ऑपरेशन टायगर” मोहिमेअंतर्गत उद्धव ठाकरे गटातील अनेक नेते आणि पदाधिकारी शिंदेसेनेत प्रवेश करत आहेत. मंत्री उदय सामंत यांनी यापूर्वीच दावा केला होता की, ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक खासदार आणि पदाधिकारी लवकरच शिंदे गटात येणार आहेत. या मोहिमेची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथून झाली असून, माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रानंतर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातही मोठे राजकीय इनकमिंग होणार असल्याचे शिंदेसेनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.