उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ आता भाजपानेही उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे. निफाडचे माजी आमदार अनिल कदम लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. सलग दोन वेळा निवडून आलेल्या कदम यांच्या भाजप प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या आधीच विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मोठे नुकसान सहन करावे लागले असून, २०१९ मध्ये ५६ जागा मिळवणाऱ्या ठाकरे गटाला यंदा केवळ २० जागांवर समाधान मानावे लागले. अनिल कदम कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करत असल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे गटाला गळती लागण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. अनेक माजी आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारी इतर पक्षांत सामील होत असून, शिंदे गटाने वारंवार ठाकरे गटाला धक्के दिले आहेत. आता भाजपानेही हा धक्का देण्याची तयारी केली असून, निफाडचे माजी आमदार अनिल कदम लवकरच त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे.
निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोरात सुरू असताना, त्यांनी स्वतः या वृत्ताचे खंडन केले आहे. प्रशासकीय कामानिमित्त मुंबईत आल्याचे स्पष्ट करत, आपला कोणताही पक्ष प्रवेश नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही प्रसारमाध्यमांद्वारे चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असून, त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन अनिल कदम यांनी केले आहे.
निफाडचे माजी आमदार अनिल कदम हे २००९ आणि २०१४ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाले होते आणि त्यांची ओळख एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून आहे. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेतली, तरीही अनिल कदम ठाकरेंच्या सोबत राहिले. निफाड तालुक्यात त्यांचा मजबूत जनसंपर्क असून, सुशिक्षित नेते म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र, त्यांना राजकीय आव्हान बाहेरून नाही, तर त्यांच्या घरातूनच आहे. त्यांचे चुलत बंधू यतीन कदम हेच त्यांच्या प्रमुख विरोधकांपैकी एक मानले जातात.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनिल कदम यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवली, मात्र राष्ट्रवादीचे दिलीप बनकर विजयी झाले. निफाड विधानसभा मतदारसंघात कदम आणि बनकर यांच्यातील राजकीय संघर्ष गेल्या काही निवडणुकांपासून सुरू आहे. २००९ मध्ये अनिल कदम यांनी ९०,०६५ मतांनी विजय मिळवला, तर दिलीप बनकरांना ५६,९२० मते मिळाली होती. २०१४ मध्येही हा सामना झाला, ज्यात अनिल कदम अवघ्या ३,००० मतांनी विजयी झाले. मात्र, २०१९ मध्ये समीकरण बदलले आणि दिलीप बनकरांनी ९६,३५४ मतांसह विजय मिळवत अनिल कदम (७८,६८६ मते) यांचा पराभव केला. त्यामुळे निफाडमध्ये कदम-बनकर संघर्ष पुन्हा उफाळणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.