राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. पीक विमा योजनेतील भ्रष्टाचारावर भाष्य करताना त्यांनी धक्कादायक विधान केले होते. आता त्यांनी “आमच्या हातात काहीही राहिलेले नाही” असे म्हणत मुख्यमंत्र्यांबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे. या वक्तव्यामुळे महायुतीत नाराजी आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राज्यस्तरीय पणन परिषदेत बोलताना महायुती सरकारच्या कार्यपद्धतीवर भाष्य केले. “आमच्या हातात काहीही राहिलेले नाही, खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी हे मुख्यमंत्री ठरवतात,” असे सूचक विधान त्यांनी केले. तसेच, “आता आम्हाला चांगलं काम करावं लागेल,” असेही त्यांनी नमूद केले.
पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राज्यस्तरीय पणन परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, “मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी स्पष्ट केलं की, कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर परिणाम होणार नाही. त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल.” तसेच, “आमचे खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी हेही मुख्यमंत्री ठरवतात, त्यामुळे आमच्या हातात काही राहिले नाही,” असेही ते म्हणाले. मात्र, “आता नीट काम करावंच लागेल आणि समाजात स्थैर्य निर्माण करण्यासाठी आपणही जबाबदारीने वागलं पाहिजे,” असा सल्लाही त्यांनी दिला.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देताना ते सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले. “चांगल्या कामासाठी काही शिस्त लावली जात असेल, तर त्याचे स्वागतच केले पाहिजे,” असे त्यांनी म्हटले. तसेच, “कोकाटे यांच्या वक्तव्याचा अर्थ मुख्यमंत्र्यांविरोधात नसून, सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. “मुख्यमंत्र्यांनी खाजगी सचिव ठरवले, तर त्यात काही गैर नाही. जनतेला केवळ प्रभावी प्रशासन हवे आहे. सरकारच्या चांगल्या कामामुळे लोक समाधानी होतील आणि सर्वांनाच आशीर्वाद देतील,” असे मत त्यांनी व्यक्त केले.