विधानसभा निवडणुकीनंतर मनसे आणि शिंदेसेनेत तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. मनसेने निवडणुकीपूर्वी कोणतीही चर्चा न करता थेट उमेदवार जाहीर केल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होते. या निर्णयाचा फटका दोन्ही पक्षांना बसला, मनसेचं नुकसान झालं आणि शिंदेसेनेलाही तोटा सहन करावा लागला. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महायुतीने मनसेसोबत पुन्हा संवाद वाढवण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर आज शिंदेसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी शिवतीर्थ येथे जाऊन राज ठाकरेंशी चर्चा केली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
शिवतीर्थ येथे मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर शिंदेसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी स्पष्ट केले की, ही भेट केवळ सौजन्यभेट होती आणि त्याला राजकीय रंग देऊ नये. पुण्यात मराठी भाषिक संमेलनाला राज ठाकरेंनी उपस्थित राहावे, अशी विनंती त्यांनी पूर्वी केली होती. त्या निमित्ताने त्यांचे आभार मानण्यासाठीच ही भेट घेतल्याचे सामंत यांनी सांगितले. तसेच मराठी भाषा, साहित्य संमेलन आणि सांस्कृतिक विषयांवर चर्चा झाली, मात्र कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“राज ठाकरे असे व्यक्तिमत्व आहेत, ज्यांच्यासोबत राजकारणापलीकडे जाऊनही संवाद साधला तर ज्ञानात भर पडते. त्यामुळे ही भेट केवळ सौजन्यभेट होती. विश्व मराठी संमेलनाला ते उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी मी आलो होतो.” राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे युतीत येणार का, याबाबत प्रश्न विचारल्यास ते उत्तर देत म्हटले, “हा विषय माझ्या क्षमतेच्या पलिकडचा आहे. एवढ्या उच्च पातळीवरील राजकीय चर्चांमध्ये मी कधी सहभागी झालेलो नाही. माझ्या कक्षा आणि मर्यादेत असलेल्या प्रश्नांनाच मी उत्तर देऊ शकतो,” असे उदय सामंत यांनी पत्रकारांना सांगितले.
दरम्यान, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येणार असतील, तर त्याबाबत थेट दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणे आवश्यक आहे. मात्र, आजची भेट पूर्णतः राजकारणविरहित होती, असे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. राज ठाकरेंच्या प्रभावी वकृत्वशैलीबद्दल बोलताना ते म्हणाले, “त्यांच्यासोबत संवाद साधल्यानंतर स्वतःतही सुधारणा घडू शकते, त्यामुळे या भेटीकडे त्या दृष्टिकोनातून पाहावे.” तसेच मराठी उद्योजक, भाषिक आणि कलाकारांवर अन्याय होऊ नये यासाठी मराठी भाषा विभागाचा मंत्री म्हणून पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मार्गदर्शन राज ठाकरेंनी केले. मराठी भाषा, साहित्य आणि कलाक्षेत्राच्या विकासासाठी काय करता येईल, यावरही गप्पांच्या ओघात चर्चा झाली, असे उदय सामंत यांनी सांगितले.