मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सावंतवाडीत भाजप संघटन पर्व कार्यक्रमात बोलताना उद्धवसेनेच्या सरपंचांना निधी न देण्याचा स्पष्ट इशारा दिला. ते म्हणाले, “ज्या गावात उद्धवसेनेचा सरपंच असेल, त्या गावाला निधी मिळणार नाही, बसा बोंबलत! एप्रिलनंतर मी संपूर्ण यादीच घेऊन बसणार आहे, मग कळेल उद्धवसेनेत राहून किती मोठी चूक झाली. तुम्ही कितीही टीका करा, पण मी माझा पक्ष वाढवणारच. माझ्या नेत्यांना मी काय ते स्पष्टीकरण देईन, पण निधी देणार नाही, यावर मी ठाम आहे.” त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
सावंतवाडीत झालेल्या भाजप संघटन पर्व कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांनी पक्षातून बाहेर गेलेली “घाण” पुन्हा पक्षात येऊ नये याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल, असे कार्यकर्त्यांना आश्वासन दिले. यावेळी उद्धव सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मडुरा येथील उल्हास परब, समीर गावडे, सचिन पालव यांच्यासह दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील पदाधिकारी यांचा या प्रवेशात समावेश होता. राणे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “ज्या गावात महायुतीचा सरपंच नाही, त्या गावाला निधी मिळणार नाही, हे मी यापूर्वीही सांगितले होते आणि आज पुन्हा सांगतो. आम्ही पक्ष वाढवण्यासाठी काम करत आहोत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमच्या याद्या दुर्लक्षित करण्याचा अनुभव आम्ही घेतला आहे, त्यामुळे त्याची परतफेड करावीच लागेल.” त्यांच्या या इशाऱ्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सावंतवाडी मतदारसंघात बाहेरच्या लोकांची गरज नाही, असे स्पष्ट करत मंत्री नितेश राणे यांनी माजी आमदार राजन तेली आणि विशाल परब यांना नाव न घेता कडक शब्दांत इशारा दिला. “काही जण आमच्या नेत्यांवर टीका करून पक्ष सोडून गेले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संभाषण व्हायरल करण्याचेही धाडस झाले. अशा लोकांना आता सोडायचे नाही. पुन्हा पक्षात येण्याचा विचारही करू नका, आणि आलेच, तर त्यांना सोडू नका,” असे राणे ठामपणे म्हणाले. “कोणाला तरी भेटून पक्षात पुनरागमनाची स्वप्ने पाहत असाल, तर हे लक्षात ठेवा दरवाज्यावर मी उभा आहे आणि तुमच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत!” तसेच, भाजप कार्यकर्ते अधिक सक्षम व्हावेत यासाठी आपण ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे असल्याचा विश्वासही त्यांनी दिला.