आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची यादी तयार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपमध्ये कोणते नेते प्रवेश करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असताना, सध्या तरी प्रमुख ताकदवान नेत्यांचा प्रवेश धूसर असल्याचे दिसते. मात्र, उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार संजय घाटगे आणि गोकुळ दूध संघाचे संचालक अंबरीष घाटगे यांच्या संभाव्य प्रवेशाची चर्चा आहे. आगामी काळात आणखी कोणत्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार, याकडे राजकीय विश्लेषक आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या मोठ्या बहुमतानंतर भाजप आणि शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मित्रपक्षांच्या सहकार्यामुळे भाजपची ताकद प्रत्येक तालुक्यात वाढताना दिसत आहे. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या चिन्हावर सदस्य निवडून आणायचे असतील, तर स्थानिक पातळीवर पक्षाची स्वबळाची ताकद महत्त्वाची ठरणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील संघटनात्मक जबाबदारी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर सोपवली आहे. त्यांनी प्रत्येक तालुक्यातील प्रभावशाली पदाधिकाऱ्यांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, त्यातूनच भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची यादी तयार असल्याचा संकेत त्यांनी दिला आहे. त्यामुळे भाजपमध्ये कोण कोण प्रवेश करणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली रणनीती आखली असून, पक्षात नव्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्यासाठी नियोजन सुरू आहे. अनेक इच्छुक भाजपमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक असून, पक्षात घेताना आधीपासून सक्रिय असलेल्या स्थानिक नेत्यांची नाराजी टाळण्याकडेही लक्ष दिले जात आहे. पक्षसंघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने नव्या प्रवेशांना संधी दिली जात असली, तरी त्यामुळे जुने निष्ठावान कार्यकर्ते दुखावले जाणार नाहीत, याची विशेष दक्षता घेतली जात आहे.