विकी कौशलच्या ‘छावा’ सिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या ऐतिहासिक भूमिकेत विकी कौशलने साकारलेल्या अभिनयाचं मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून प्रेक्षक या सिनेमाला उत्तम प्रतिसाद देत आहेत. थिएटर हाऊसफुल्ल होत असताना, आज शिवजयंतीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘छावा’ सिनेमाला करमुक्त (टॅक्स-फ्री) करण्याबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.
विकी कौशलच्या ‘छावा’ सिनेमाला करमुक्त करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सांगितलं की, “इतर राज्यांमध्ये करमुक्त सिनेमा म्हणजे करमणूक कर माफ करणे असते. मात्र, महाराष्ट्राने २०१७ सालीच हा निर्णय घेतला असून राज्यात करमणूक कर आधीच रद्द करण्यात आला आहे. महाराष्ट्रात करमणूक कर २०१७ पासूनच कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे, त्यामुळे अशाप्रकारच्या टॅक्स माफीचा प्रश्नच येत नाही.” मात्र, छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी राज्य सरकार नक्कीच आणखी चांगल्या उपक्रमांचा विचार करेल, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘छावा’ सिनेमाबाबत आपल्या भावना व्यक्त करत चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेता विकी कौशल यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी सांगितले की, “छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, वीरता आणि विद्वत्ता अपार होती, पण इतिहासाने त्यांच्यावर मोठा अन्याय केला. ‘देश-धर्मासाठी बलिदान देणारा शेर शिवरायांचा छावा होता, महापराक्रमी आणि परमप्रतापी एकच शंभूराजे होते’ असे गौरवोद्गार त्यांच्याबाबत काढले गेले आहेत. त्यामुळे या महान योद्ध्यावर ऐतिहासिक आणि सत्याला धरून सिनेमा तयार झाला, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मी अजून हा सिनेमा पाहिला नाही, पण पाहणाऱ्यांच्या मते हा इतिहासाशी प्रामाणिक चित्रपट आहे. त्यामुळे सिनेमाच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन!”