माजी आमदार राजन साळवी यांच्या भविष्यासंदर्भातील चर्चा अखेर संपुष्टात आली असून त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र, आता त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतः राजन साळवी यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देत लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
राज्यात ठाकरे गटातील नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची सतत सुरू असलेली गळती अजूनही थांबलेली नाही. अनेक पदाधिकारी, जिल्हाप्रमुख, माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करत असल्याने उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू असतानाच, पक्ष सोडणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. अशातच माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश करत ठाकरे गटाला थेट आव्हान दिले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शिवसेनेतील गटबाजी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
राजन साळवी यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशाची घोषणा होताच ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. खासदार विनायक राऊत यांनी साळवी यांनी निवडणुकीत नितेश राणे यांना मदत केल्याचा आरोप केला. यावर प्रत्युत्तर देताना राजन साळवी यांनी आपली भूमिका स्पष्ट करत, गेल्या ३८ वर्षांत शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार काम केल्याचे ठामपणे सांगितले. तसेच, कुणाकडून पैसे घेतल्याचा आरोप सिद्ध केल्यास मी तात्काळ राजकीय संन्यास घेईन, असे थेट आव्हान त्यांनी ठाकरे गटाला दिले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपले गुरू मानत असल्याचे स्पष्ट केले. पूर्वी त्यांच्यासोबत जाण्याची संधी मिळाली नव्हती, मात्र आता योग्य निमित्त मिळाल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे साळवी यांनी सांगितले. शिंदे साहेबांचा आशीर्वाद घेतल्याचे त्यांनी नमूद करत, जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांचीही उपस्थिती असल्याचे सांगितले. तसेच, एकनाथ शिंदे यांनी आपल्या सन्मानाची जबाबदारी घेतली असून भविष्यात जिल्हा आणि राज्य पातळीवर एकत्रितपणे काम करू, असे वचनही दिल्याचे साळवी यांनी स्पष्ट केले.