राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे काल रात्री दिल्लीत रवाना झाले असून, त्यांच्या या दौऱ्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सध्या शिंदे गटाकडून ‘ऑपरेशन टायगर’ राबवले जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असताना, त्यांचा अचानक दिल्लीत दाखल होणं राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं मानलं जात आहे. शिंदे आज भाजपच्या केंद्रीय नेत्यांची भेट घेणार असून, या भेटीत आगामी राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही खासदार लवकरच शिंदे गटात दाखल होतील, असा दावा शिंदे गटातील नेत्यांकडून करण्यात आला होता. मात्र, या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत या चर्चांना फेटाळून लावले. त्यांनी पक्ष एकसंध असल्याचा पुनरुच्चार केला असला तरी पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम मिळालेला नाही. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाल्याने आणि ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याने या चर्चांना आणखी जोर मिळाला आहे.
तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटीचं आणखी एक महत्त्वाचं कारण समोर येत असून, रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा अद्यापही तोडगा निघालेला नाही. महायुती सरकार स्थापन होऊन काही महिने उलटल्यानंतरही या दोन जिल्ह्यांसाठी पालकमंत्री नियुक्ती न झाल्याने शिंदेसेनेत नाराजी आहे. यापूर्वी शिंदे गटाने नाराजी व्यक्त केल्यानंतर या नियुक्तींना स्थगिती देण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली होती. मात्र, हा तिढा अद्याप कायम असल्याने एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांसोबत या मुद्द्यावर चर्चा करण्याची शक्यता आहे.