बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राच्या कृषक प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे एकाच मंचावर एकत्र आले. मयुरेश्वर अभयारण्यातील चिंकारा हरणाची प्रतिकृती खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देऊन अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांचा सत्कार करण्यात आला. राजकीय समीकरणांमध्ये बदल झाल्यानंतर, एकमेकांविरोधात शड्डू ठोकलेले पवार कुटुंबीय एकत्र दिसले, तरीही या समारंभात कोणताही अपेक्षित संवाद किंवा चर्चा रंगताना दिसली नाही.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर काका-पुतण्या, नणंद-भावजय एकाच मंचावर एकत्र आले. यावेळी रोबोटने सत्कारासाठी लहान रोपटं आणल्यावर, सुप्रिया सुळे यांच्या हस्ते अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचा सत्कार करण्यात आला. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होत असलेल्या या सत्कारावेळी अजित पवार यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आज दोन मंत्री येथे उपस्थित आहेत आणि आम्ही पुन्हा येथे येण्याची आशा ठेवतो.” तसेच, “आता वर्षभर निवडणुका नाहीत, म्हणून तिळगूळ घेऊन गोड गोड बोलूया,” असे सांगत त्यांनी सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सभागृहात मिश्किल टिप्पणी करत ते म्हणाले, “सकाळी लवकर उठून कामाला लागणे हा माझा पहिलाच अनुभव आहे. अजित दादांना हे माहित आहे की मी उशिरा उठतो, आणि त्यांनी रात्रीच सांगितलं होतं की उद्याच्या दिवसाची तयारी करावी लागेल. त्यावर मी त्यांना उत्तर दिलं की, जेव्हा गरज असते, तेव्हा खांद्याला खांदा लावून मी नेहमीच उपस्थित असतो. आणि जर असं नसल्यास, तर पहाटेचा शपथविधी आठवा, कारण त्या वेळी मीच पाठीमागे उभा होतो.” कोकाटे यांच्या या वाक्यांमुळे सभागृहात हास्याचे वातावरण निर्माण झाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणाची सुरूवात ‘आदरणीय पवारसाहेब’ आणि इतर उपस्थित मंत्र्यांचा उल्लेख करून केली, तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कोणाचेही नाव न घेता थेट भाषणाला प्रारंभ केला. नेहमी उपस्थित मान्यवरांची नावे घेऊन भाषण सुरू करणारे शरद पवार आजच्या भाषणात अपवाद ठरले, ज्यामुळे उपस्थितांमध्ये वेगळा ठसा निर्माण झाला.