शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला. या निवडणुकीत त्यांना अवघ्या १० जागांवर समाधान मानावे लागले. या अपयशामुळे पक्षात निराशेचे वातावरण आहे तसेच नेतृत्वाबाबत चर्चा वाढल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावरून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या दोन दिवसीय मुंबई बैठकीत आक्रमक भूमिका घेतली आणि अजित पवारांच्या गटातील नेत्यांच्या भेटीगाठीमुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची चिंता व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये निराशा आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. या पराभवामुळे कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या गटाशी काही महत्त्वाचे नेते जवळीक साधताना दिसत आहेत, ज्यामुळे पक्षाच्या एकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जयंत पाटील यांनी बैठकीत यावर नाराजी व्यक्त केली असून, बैठकीत पहिल्या रांगेत बसलेले काही नेते अजित पवार गटाकडे पुष्पगुच्छ घेऊन गेले असे म्हणत जयंत पाटील यांनी संबंधित नेत्यांना कडवट शब्दांत टोला लगावल्याचे समोर येत आहे.
जयंत पाटील यांच्या अजित पवारांच्या गटात सामील होण्याच्या चर्चांना बारंवार उधाण येते. असं सांगितलं जातं की, अजित पवारांनी पाटील यांच्यासाठी एक मंत्रिपद रिक्त ठेवले आहे. “मी कुठेही जाणार नाही. जायचं असतं तर यापूर्वीच गेलो असतो,” असे स्पष्ट करत जयंत पाटील यांनी चर्चांवर पूर्णविराम ठेवला आहे. त्यांच्या या खुलाशामुळे चर्चांना थांबण्याची स्थिती निर्माण झाली आहे. ‘टीव्ही ९ मराठी’ ने याबाबतची माहिती दिली आहे.
दरम्यान, जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आळस झटकून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले आहेत.