बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपींपैकी दोन आरोपींना २५ दिवसांनी पोलिसांनी अटक केली आहे. तरीही, अजून एक आरोपी फरार आहे, आणि त्याचा शोध सुरू आहे. सीआयडी पथक आणि एसआयटीद्वारे संयुक्त तपास करत दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेवर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
सुरेश धस यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी जोरदार प्रतिक्रिया व्यक्त केली असून, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून बोलत असल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, आरोपींना पुण्यातून अटक होण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी शंका उपस्थित केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही यावर टीका केली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आरोपींच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना एक महत्वाची मागणी केली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुदर्शन धुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक झाल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी सरकारकडून या प्रकरणी तातडीने नार्को टेस्ट करायला हवी, अशी मागणी केली. त्यांच्यानुसार, खंडणी आणि हत्येच्या गुन्ह्यातील आरोपींची नार्को टेस्ट होणे अत्यंत आवश्यक आहे, कारण यामध्ये मोठे रॅकेट असू शकते. जरांगे पाटील यांनी सरकारवर आरोप करत म्हटले की, पुण्यातून आरोपींना पकडले जात असले तरीही त्यांना सरकार आणि मंत्र्यांचे राजकीय पाठबळ असल्याचा अंदाज आहे, आणि सरकारने त्यांना संरक्षण देणाऱ्यांनाही अटक करावी.
अगदी कूर पद्धतीने देशमुख यांची हत्या झाली. आरोपींच्या अटकेनंतर त्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठिंबाये, कारण हे एक मोठे रॅकेट आहे. आरोपींना संरक्षण देणारे मंत्री आणि आमदार हे सामूहिक कटात सामील आहेत, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. तसेच जरांगे पाटील यांनी सरकारमधील मंत्र्यांवर आरोप करत सांगितले की, हे लोक बीड आणि पुण्याचा नाव खराब करत आहेत, तसेच या प्रकारचे कट शिजत असून सरकारने त्यांना संरक्षण देण्याचे थांबवावे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गृहमंत्रालयावर तीव्र शब्दात हल्ला केला. यांचा बाप जरी आला तरी आम्ही हे प्रकरण थंड होऊ देणार नाही. “गृहमंत्रालयाने आरोपींना लपवून ठेवणाऱ्यांना सोडू नये. खुनात जबाबदार असलेले सर्व लोक पकडले जावेत.” या प्रकरणात आरोपींची संख्या ५० ते ६० पर्यंत जाऊ शकते आणि गुन्हेगारांना लपवून ठेवणे ही चुकीची भूमिका आहे. त्यांना धडा शिकवण्यासाठी सरकारने कडक कारवाई करावी, असे ते म्हणाले.