Posted in

“बीड प्रकरणी SIT अहवालानंतरच होईल धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय; राधाकृष्ण विखे-पाटलांचा दावा”

मस्साजोग सरपंच हत्या व खंडणी प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली असून, एसआयटीचे पथक केजमध्ये दाखल होऊन चौकशी करत आहे. याच दरम्यान, बीड शहरात सीआयडीने वाल्मीक कराड याची दिवसभर चौकशी केली. हत्या प्रकरणातील तीन फरार आरोपींना वॉटेड म्हणून घोषित करण्यात आले आहे. हत्येच्या तपासासाठी उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. सीआयडी खंडणी आणि मारहाण प्रकरणांचा तपास करत आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला आहे. परंतु, या संदर्भात धनंजय मुंडे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देत म्हटले की, “या घटनेत माझा काहीही संबंध नाही, मग मी राजीनामा का द्यावा?” धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत भाजपा नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गंभीर दावा केला आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी पथक नेमण्यात आले असून, या तपास पथक बीडमध्ये तपास करून अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करणार आहे. अशी माहिती भाजपा नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. तसेच एसआयटीचा अहवाल आल्यानंतरच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा तीव्र झाली आहे.

दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी विरोधकांनी पुन्हा सुरू केली आहे. वाल्मीक कराड यांच्यावर हत्येचा गुन्हा नसलातरी, ते या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. वाल्मीक कराड हे अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे घनिष्ठ सहकारी असून, गेल्या अनेक वर्षांपासून ते बीडमधील त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचे काम पाहत आहेत. अशा परिस्थितीत, वाल्मीक कराडांशिवाय धनंजय मुंडे यांचे पानही हलत नाही, असे म्हटले जाते. यामुळे, आता धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply